Asia Cup : विजेत्या संघावर होणार पैशांचा वर्षाव; बक्षिसाच्या रकमेत एक कोटींची वाढ

Asia Cup 2025 Winner Prize Money : आशिया कप क्रिकेट स्पर्धा येत्या 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील फायनल सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा आहे. स्पर्धा सुरू होण्यासाठी तीन दिवस बाकी आहेत. मात्र त्याआधीच क्रिकेट संघांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एशियन क्रिकेट काउंसिलने विजेत्या संघाच्या बक्षीसाच्या रकमेत घसघशीत वाढ केली आहे. लाखोत नाही तर कोटींत वाढ झाली आहे. त्यामुळे विजेता होण्यासाठी क्रिकेट संघात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
आशिया कपमधील सामने टी20 पद्धतीने होणार (Asia Cup 2025 Winner Prize Money) आहेत. याआधी 2022 मध्ये आशिया कप टी 20 प्रकारांत झाला होता. त्यावेळी श्रीलंका विजेता ठरला होता. बक्षीस म्हणून श्रीलंकेला (Sri Lanka) दोन लाख अमेरिकन डॉलर देण्यात आले होते. भारतीय रुपयांत ही रक्कम 1.6 कोटी रुपये इतकी होते. आताच्या आशिया कपमध्ये विजेता होणाऱ्या संघाला तीन लाख डॉलर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. भारतीय रुपयांत हिशोब केला तर ही रक्कम 2.6 कोटी रुपये इतकी होते. म्हणजेच बक्षीसाच्या रकमेत तब्बल एक कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
मोठी बातमी! आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान
कधी होणार भारताचे सामने
आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादवच्या (Surya Kumar Yadav) नेतृत्वात टीम इंडिया मैदानात (Team India) उतरणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ ग्रुप ए मध्ये आहे. या गटात पाकिस्तान, ओमान आणि यूएई आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध आहे. यानंतर 14 सप्टेंबर रोजी टीम इंडिया पाकिस्तानला (India vs Pakistan) भिडणार आहे. यानंतर 19 सप्टेंबरला ओमान विरुद्ध भारताचा सामना आहे.
28 सप्टेंबरला होणार फायनल
साखळी फेरीतील सामन्यांनंतर दोन्ही गटांतून दोन-दोन टीम सुपर 4 फेरीत पोहोचतील. या फेरीत या चार टीम एकमेकांविरुद्ध सामने खेळतील. यातील दोन टीम फायनलमध्ये पोहोचतील. यानंतर या दोन्ही टीममध्ये 28 सप्टेंबर रोजी फायनल सामना होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यासाठी आता फक्त तीन दिवस शिल्लक राहिले असून क्रिकेट चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
चक दे इंडिया! आशिया कप हॉकी स्पर्धेत मलेशियावर मात; सुपर 4 मध्ये टीम इंडियाच ‘दादा’