World Cup 2023 : भारताचा सलग आठवा ‘विराट’ विजय, दक्षिण आफ्रिकेचा 83 धावांत खुर्दा !

  • Written By: Published:
World Cup 2023 : भारताचा सलग आठवा ‘विराट’ विजय, दक्षिण आफ्रिकेचा 83 धावांत खुर्दा !

India vs South Africa : वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) भारताने सलग आठवा विजय मिळविला आहे. भारताने दिलेल्या 327 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 83 धावांवर गारद झाला आहे. पाँइट टेबलमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. तर आफ्रिका संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारताबरोबर आफ्रिका संघही सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे.

विराट कोहली (Virat Kohli) व इतर फलंदाजांनी शानदार कामगिरी करत मोठी धावसंख्या उभारली होती. त्यानंतर गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. रवींद्र जडेजा व कुलदीप यादवच्या फिरकीच्या जाळ्यात फलंदाज अडकले. रवींद्र जडेजाने पाच विकेट घेतल्या आहेत.वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व फिरकीपटू कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने एक विकेट घेतल्या.

हिटमॅन रोहित शर्मा ठरला सिक्सर किंग; एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी

मोठ्या धावसंख्येची पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची भारतीय गोलंदाजांसमोर दाणादाण उडाली होती. भरवशाचा फलंदाज क्विंटन डी कॉक हा पाच धावांवर बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने बोल्ड केले. त्यानंतर आफ्रिकेच्या विकेट पडत गेल्या. अवघ्या चाळीस धावांवर आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परतला होता. एकही फलंदाजाला डाव सांभाळण्याची संधी भारतीय गोलंदाजांनी दिली नाही. शेवटी आफ्रिकेचा संघ 83 धावांत ऑलआऊट झाला आहे. ही लढत भारताने 243 धावांनी जिंकली आहे. भारताने सलग आठ विजय मिळवून आपल्याच 2003 च्या वर्ल्डकपमध्ये विजयाचा रेकॉर्डची बरोबरी केली आहे.


कोहली, अय्यरची शानदार खेळी

विराट कोहलीने आज 49 वे शतक झळकविले आहे. त्याने सचिन तेंडुलकरच्या वनडेमधील 49 व्या शतकाशी बरोबरी केली आहे. विराटने 289 वनडे मॅचमध्ये 49 शतक झळकविले. कोहलीने श्रेयस अय्यर बरोबर तिसऱ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी केली. अय्यरने 77 धावांची खेळी केली आहे. रोहित शर्माने स्फोटक सुरुवात केली. रोहितने 24 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकार मारत 40 धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला. त्याचे प्रेक्षकांनी जोरदारपणे स्वागत केले. कोहलीने रबाडाला चौकार मारत खाते उघडले. त्यानंतर शुभमन गिलने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला केशव महाराजने तंबूत परतविले. स्फोटक सुरुवात झालेल्या डाव सांभाळण्यासाठी कोहली आणि श्रेयसने संयम दाखवत खेळ केला. श्रेयस हा 77 धावांवर बाद झाला. त्याने सात चौकार आणि दोन षटकार मारले. कोहली 101 धावांवर नाबाद राहिला. सूर्यकुमार यादवने 19 चेंडूत 22 धावा केल्या. रवींद्र जडेजानेही 15 चेंडूत 29 धावांची खेळी केली. या जोरावर भारताने पाच विकेट्स गमावून 326 धावा केल्या होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube