मुंबईच्या युवा फलंदाजासाठी भारतीय संघाची दारे पुन्हा खुली; 15 ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेला सुरुवात
भारतीय संघ सध्या कोलंबोमध्ये असून, सराव सामन्यात भारताने श्रीलंका एकादशचा पराभव केला आहे.
मुंबईचा युवा फलंदाज सरफराज खान याचे (Sprts) भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. फलंदाज साई सुदर्शन याच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी सरफराजला संघात स्थान देण्यात आले आहे. तब्बल पावणेदोन वर्षांनंतर सरफराजला भारतीय संघात पुन्हा संधी मिळाली आहे. त्याने नोव्हेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून अखेरची कसोटी खेळली होती.
तर यशस्वी जैस्वालवर 4 सामन्यांची बंदी; रहाणेने केला सर्वात मोठा खुलासा
भारतीय संघ सध्या कोलंबोमध्ये असून, सराव सामन्यात भारताने श्रीलंका एकादशचा पराभव केला आहे. आता भारतीय संघ गॉलकडे रवाना होणार असून, 15 ऑगस्टपासून गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिली कसोटी खेळली जाणार आहे. गॉलकडे रवाना होण्यापूर्वी सरफराज संघात दाखल होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
साई सुदर्शनच्या दुखापतीत सुधारणा
दरम्यान, साई सुदर्शनच्या दुखापतीबाबतही बीसीसीआयने अपडेट दिले आहे. सुदर्शन सध्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये असून, त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीत सुधारणा होत आहे. तो दुखापतीतून वेगाने सावरत असून, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
सरफराजची कसोटी कारकीर्द
सरफराज खानने 2024 मध्ये भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले. आतापर्यंत त्याने 6 कसोटी सामने आणि 11 डावांत 371 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 1 शतक आणि 3 अर्धशतके आहेत. न्यूझीलंडविरुद्ध नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या कसोटीनंतर त्याला संघातून बाहेर ठेवण्यात आले होते. आता साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळाले आहे. मात्र, सरफराजला अंतिम प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार का? याकडं क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
भारताचा संघ
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी आणि सरफराज खान.