Chandrakant Patil : … तर चिंचवड निवडणूक बिनविरोध करु
पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे दीर्घ आजारपणामुळे निधन झाले आहे. त्यामुळे येथील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. कारण लक्ष्मण जगताप यांचे सर्वपक्षीय संबंध अतिशय उत्तम होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. त्यासाठी भोसरीचे आमदार तथा भाजपचे (BJP) पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. लवकरच याबाबत घोषणा करू, असे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. मात्र, गाफिल न राहता आम्ही या निवडणुकीची तयारी देखील करत असल्याचे त्यांनी सांगितले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, लक्ष्मण जगताप हे केवळ आमदार नव्हते. तर ते खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवड शहराचे नेते होते. तसेच लक्ष्मण भाऊंचा सर्वपक्षीय चांगले संबंध असल्याने याबाबत काय करता येईल याविषयी चर्चा केली. आजच्या बैठकीत उमेदवार ठरवण्यासाठी नाही तर आम्ही चिंचवड पोटनिवडणूक संदर्भात अन्य पक्ष काय-काय तयारी करत आहे. बूथ, कार्यालय कधी सुरु करायचे, प्रमुख कोण असतील याचीही माहिती घेतली. आजची बैठक ही उमेदवारी मागण्याची किंवा इच्छा व्यक्त करण्याची अजिबात नव्हती. उमेदवार ठरण्यासाठी प्रदेश आणि केंद्र पातळीवरून निर्णय घेतला जाईल.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाशी नियमित संपर्क पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच आज आम्ही तीन समित्यांची स्थापना केली आहे. त्याची जबाबदारी अमोल थोरात, बापू काटे यांच्यावर देण्यात आली आहे. ते सगळं नियोजन करणार आहेत. बाकी पदाधिकारी त्यांना साहाह्य करतील.