Circus Review : संजय मिश्रा आणि सिद्धार्थ जाधवच्या कॉमेडी टायमिंगने वेधलं लक्ष

Circus Review : संजय मिश्रा आणि सिद्धार्थ जाधवच्या कॉमेडी टायमिंगने वेधलं लक्ष

दिग्दर्शक रोहीत शेट्टीचा चित्रपट म्हटला की, कॉमेडी, मसाला आणि मनोरंजन हे येतच. हेच ‘सर्कस’ या चित्रपटातही पाहायला मिळतय. या चित्रपटात पाहायला मिळतेय (Farce)म्हणजेच उपहासात्मक कॉमेडी. रोहीत शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह आणि वरुण शर्मा दुहेरी भूमिकेत झळकला. भूमिकांचा डबल धमाका असला तरी फारशी कमाल करु शकलेला नाही.

चित्रपटाची कथा गुंतागुंतीची आहे. अर्थात दोन दुहेरी भूमिका असल्यामुळे उडणारा गोंधळ यात पाहायला मिळतो. रॉय आणि जॉय यांची ही कहाणी आहे. एकीकडे रॉय हा विजेशी खेळणारा सर्कसमध्ये काम करणारा करंट मॅन आहे तर दुसरीकडे साधा सरळ असलेला त्याचा डुब्लिकेट. या सगळ्यात दुहेरी भूमिकांमुळे झालेला त्यांच्या कुटुंबियांचा आणि इतरांचा गोंधळ आणि त्यातून समोर आलेलं सत्य ही सगळी कथेतील गंमत यात सादर करण्यात आला. चित्रपटाची कथा जशी पुढे सरकत जाते तशी एकापेक्षा एक विविध पात्रांची भर त्यात पडते. अनेक उत्तम कलाकारांची फळी या चित्रपटाला लाभली.

रणवीर सिंहकडून या चित्रपटाच्या बाबतीत बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र त्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. दुहेरी भूमिका असतानाही दोन्ही भूमिकांमध्ये रणवीरच्या वाट्याला फारश्या गोष्टी करण्यासाठी वाव नव्हता. त्यामुळे दोन्ही पात्र खुलवण्यात आणि लक्ष वेधून घेण्यात अपयश आलय. तर दुसरीकडे वरुण शर्माच्या वाट्यालाही फारशी कॉमेडी आली नसल्याने त्याचा हातखंडा असलेला कॉमेडी जॉनर फारसा प्रभावी वाटत नाही.

याउलट इतर कलाकारांनी चित्रपटाची पडती बाजू उत्तम सांभाळली आहे. यात संजय मित्रा यांनी साकारलेली वडिलांची भूमिका चांगलीच लक्ष वेधून घेते. त्यांच्या वाट्याला आलेले संवाद त्यांनी कॉमेडी अंदाजात उत्तम सादर केलेत. तर संवादकौशल्य आणि त्यांच्या हटके स्टाईलने कॉमेडी टायमिंग चोख बजावत लाफ्टर घेतलाय. संजय मित्रा यांचे प्रत्येक सीन पोट धरुन हसवतात. तर दुसरीकडे अभिनेता सिद्धार्थ जाधवचा पॉवरपॅक परफॉर्मन्स या चित्रपटाची जमेची बाजू आहे. सिद्धार्थने प्रत्येक सीन कॉमेडीच्या कमाल टायमिंग आणि हटके शैलीने रंजक बनवलेत. संवादकौशल्याने, जबरदस्त हावभाव सादर करत सिद्धार्थ या चित्रपटात भाव खाऊन जातो. मोमो हे पात्र सिद्धार्थ या चित्रपटात साकारतोय. त्याची हटके लकब त्याने चोख बजावलीय. सिद्धार्थचं पात्र या चित्रपटात खळखळून हसवतं.

पूजा हेगडेने साकारलेली माला आणि जॅकलीन फर्नांडीसने साकारलेली बिंदू या भूमिकांमध्ये दोघींचीही अभिनय क्षमता प्रत्येक सीनमध्ये कमी पडलीय. सुलभा आर्या, अनील चरणजीत यांचं पात्र विशेष लक्ष वेधून घेतं. तर जॉनी लिव्हर, व्रजेश हिरजी, मुरली शर्मा, अश्विनी काळसेकर, टिकू तलसानिया, विजय पाटकर, ब्रिजेंद्र काला, उदय टिकेकर, सौरभ गोखले यांचीही उत्तम साथ मिळालीय.

चित्रपटाचा पूर्वार्ध धिम्या गतीने पुढे जातो तर उत्तरार्ध रंजक ठरतो. चित्रपटात गाणी, कॉमेडी, साधी सोपी कहणी, रंगीबेरंगी दृश्य, निसर्गरम्य उटी या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. बालीश वाटरणारे तरी हसवणारे विनोद उत्तम कॉमेडी टायमिंगमुळे शेवटपर्यंत मात्र खिळवून ठेवतात. हा एक फॅमिली एन्टरटेनर चित्रपट असला तरी बच्चेकंपनीचं मनोरंजन करणारा सिनेमा आहे.

रेटिंग – 3 स्टार्स
प्रेरणा जंगम, चित्रपट समीक्षक

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube