मिलिंद देवरा, पार्थ पवार, विनोद तावडे ‘राज्यसभेच्या’ शर्यतीत… राणेंना ‘नारळ’ मिळणार?
मुंबई : नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीच येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. त्यासाठी येत्या काही दिवसांतच निवडणूक जाहीर होणार आहेत. त्यामुळे आतापासूनच कोणत्या पक्षांकडून कोण उमेदवार असू शकतात याबाबतच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. (Former Union Minister Milind Deora, BJP National General Secretary Vinod Tawde and Deputy Chief Minister Ajit Pawar’s son Parth Pawar may contest Rajya Sabha election)
महाराष्ट्रातून 2018 साली राज्यसभेवर निवडून गेलेल्या सहा खासदारांची मुदत दोन एप्रिल रोजी संपत आहे. यात नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि व्ही मुरलीधरन या भाजपच्या तीन, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या वंदना चव्हाण, काँग्रेसचे कुमार केतकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अनिल देसाई यांचा समावेश आहे. या जागा पुन्हा निवडून देण्यासाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या किंवा मार्च महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
Rohit Pawar : ‘राष्ट्रवादी’चा निकाल अजितदादांच्या विरोधात? रोहित पवारांनी नेमकं काय सांगितलं
विधानसभेच्या सध्या दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे नियमानुसार एक जागा निवडून येण्यासाठी 41 मतांची गरज आहे. सध्या भाजपचे 104 आमदार आहेत. सध्याच्या संख्याबळानुसार भाजपच्या स्वतःच्या मतांवर दोन जागा सहज निवडून येऊ शकतात. त्यानंतर त्यांच्याकडे 22 मते शिल्लक राहतात. तर सरकारला 22 छोट्या पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. या मतांच्या मदतीने तिसरी जागाही निवडून येऊ शकते. याशिवाय काँग्रेसचीही एक जागा सहज निवडून येऊ शकते.
दुसऱ्या बाजूला सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची जागा शिंदेंच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाची जागा अजित पवार यांच्या गटाला मिळण्याचे चित्र आहे. शिंदेंचे सध्या 40 तर अजितदादांचे 41 आमदार आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर दोघांचेही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. मात्र जर महाविकास आघाडीने एकच उमेदवार दिल्यास पाच महायुतीचे आणि एक महाविकास आघाडीचा उमेदवार अशी बिनविरोध निवडणूक होऊ शकते. तर सर्व संमतीने महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार दिल्यास वरील सुत्राप्रमाणे निवडणूक होण्याचे चित्र आहे.
शिवसैनिक कोणाचा गमछा घालत नाहीत पण शिंदेंनी..,; अंधारेंनी भाजपच्या गमछ्यावरुन घेरलं
मिलिंद देवरा, पार्थ पवार, विनोद तावडे राज्यसभेच्या शर्यतीत..
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंना मिळणाऱ्या जागेवर मिलिंद देवरा यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जाते. देवरा निवडणूक लढवत असलेल्या दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपचा डोळा आहे. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावांची या मतदारसंघातून चर्चा सुरु आहे. त्यामुळे देवरा यांनी राज्यसभेचा मार्ग निवडल्याचे सांगितले जात आहे. जरी ही जागा शिवसेनेलाच मिळाली तरीही आधी राज्यसभेवर जायचे आणि नंतर लोकसभेचीही निवडणूक लढवायची. लोकसभेला पराभव झाला तरीही राज्यसभेची खासदारकी कायम ठेवायची असा सेफ गेम देवरा यांनी खेळला असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळ, किंवा शिरुर मतदारसंघ सोडण्यास शिवसेनेने नकार दिल्याचे समजते. त्यामुळे आता त्यांना राज्यसभेच्या मार्गेने दिल्लीला पाठविण्याचे नियोजन अजितदादांनी केल्याचे सांगितले जाते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हेही 2019 पासून संसदेत जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र मागील दोन्ही वर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांची वर्णी लागली नव्हती. आता नारायण राणे यांच्या जागी तावडेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
राज्यसभेचे सुत्र कसे असते?
राज्यसभा निवडणुकीसाठीच्या जागाच्या संख्येत एक ही संख्या मिसळून विधानसभेच्या जागांच्या संख्येला या संख्येने विभाजित केल्यानंतर विजयासाठी आवश्यक मतसंख्या आपल्याला मिळते. यंदा राज्यातील 6 जागांवर निवडणूक होणार आहे. म्हणजे 6 + 1 = 7 ही संख्या निवडणुकीसाठी गृहीत धरायची असते. विधानसभेच्या सध्या दोन जागा रिक्त असल्याने 286 / 7 = 40.5 म्हणजेच या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला 41 मतांची आवश्यकता असेल.