कोयता गॅंग का फोयता…, अजित पवारांनी पुन्हा दिला इशारा
पुणे : कोयता गॅंग का फोयता गॅंग, मला ते चालणार नसून अशा घटना खपवून घेणार नसल्याचा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात बोलत होते. यावेळी पुण्यात घडलेल्या घटनांवरुन अजित पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.
ते म्हणाले, पुण्यासह बारामती आणि बाहेर जिल्ह्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्यांना इथं सुरक्षित वाटलं पाहिजे. त्यांच्यावर कोणीही दमदाटी, अथवा दहशत माजवण्याचा प्रयत्न करता कामा नये. मला ते चालणार नसून ते खपवून घेतलं जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
तसेच आमच्या माय भगिनी रस्त्यावरुन जात असताना त्यांना त्रास होता कामा नये, कोणत्याही पोरांनी गुंडांगर्दी न करता दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. कोयता असो वा फोयता गॅंग , मला असं चालणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
या घटनांची पोलिसांनी गंभीरपणे दखल घेतली पाहिजे, तसेच आपण एक परिवार म्हणून एकमेकांना आधार देतो. कोणाला काही अडचण असेल तर मला सांगा त्यांना त्यातून बाहेर काढण्याच काम करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलंय.
दरम्यान, आपण साधुसंतांचे विचार आत्मसात केले पाहिजे, आपल्या घरातील तरुणांना साधुसंतांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले आहेत. पुण्यात थर्टीफर्स्टच्या रात्री एका विद्यार्थ्याचा हात तोडण्यात आल्याची घटना घडली होती. तर तरुणांकडून पुण्यात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
एकंदरीत या सर्व घटनांवरुन पोलिसांचं भय गुन्हेगारांना आहे की नाही? हा सवाल उपस्थित करण्यात आला होता. यासंदर्भात पोलिस खात्याने गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याचंही सांगितल्याचं अजित पवारांनी सांगितलंय.