‘ए रिक्षावाल्या नाही, अहो रिक्षावाले म्हणा’, विनोद तावडेंनी सांगितली बापटांची आठवण
Girish Bapat Passes Away : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat Passes Away) यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज अखेर त्यांची जीवनाची झुंज अपयशी ठरली.
बापट यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी होणार आहेत. तत्पुर्वी, त्यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
बापट यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिय दिली. तसेच त्यांनी बापट यांच्याबद्दलची एक आठवणही सांगितली.
तावडे म्हणाले, मी कॉलेज जीवनात असल्यापासून त्यांचे राजकारण पाहत आलो आहे. भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्याबरोबर आम्हाला काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. राज्याच्या मंत्रिमंडळात ते संसदीय कार्यमंत्री होते. तेव्हा नेहमीच आमदारांच्या सहाय्यकांच्या बैठका घ्यायचे. त्यावेळी ते आवर्जुन त्यांच्या अडचणी जाणून घ्यायचे. या अडचणी सोडिवण्यासाठी प्रयत्न करायचे.
मला आठवते त्यांनी एकदा पुण्यात एक खास पद्धतीचे स्टीकर तयार केले होते. त्यावर म्हटले होते की रिक्षावाल्यांना ए रिक्षावाला असे म्हणू नका तर अहो रिक्षावाले असे म्हणा. कारण, रिक्षावालेही कुणाचे तरी वडील आहेत. कुणाचे तरी मोठे भाऊ आहेत. म्हणजेच, समाजातील प्रत्येक घटकांकडे ते किती बारकाईने लक्ष द्यायचे हे यावरून दिसते, असे तावडे म्हणाले.
Girish Bapat : रोहित टिळक विरोधात, राहुल गांधी प्रचाराला आले, तरीही बापटांनी गड राखला
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट हे आजारी होते. कालपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ICU मध्ये दाखल करण्यात आले होते. गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. गेल्या अनेक वर्षे पुण्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता.
नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप पक्ष अडचणीत सापडला असताना गिरीश बापट यांनी आजारपणातही कार्यकर्त्यांच्या मेळावा घेत त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला होता. या मेळाव्याला त्यांच्या नाकात नळी आणि सोबत ऑक्सिजन सिलेंडर होता.
कसबा पोटनिवडणुकीच्या काळात भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे गिरीश बापट यांच्या पुण्यातील घरी गेले होते. यावेळी अमित शाह आणि गिरीश बापट यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन प्रकृतीची विचारपूस करत भरपूर गप्पा मारल्या होत्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. बापट यांची सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असणारे आणि निवडणुकीच्या राजकारणात माहीर असलेला नेता म्हणून अशी ओळख होती.