बंद होणाऱ्या मराठी शाळेची व्यथा; चित्रीकरण झालेल्या शाळेत झाला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चा ट्रेलर अनावरण
Krantijyoti Vidyalaya – Marathi Medium या चित्रपटाचा ट्रेलर ज्या शाळेत चित्रीकरण झाले, त्याच शाळेच्या चौकात रिलीज करण्यात आला आहे.
The trailer of ‘Krantijyoti Vidyalaya – Marathi Medium’ was unveiled at the school where it was filmed : मराठी शाळांच्या अस्तित्वावर मनोरंजक पद्धतीने भाष्य करणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच एका अनोख्या आणि भावनिक वातावरणात प्रदर्शित झाला. अलिबाग मधील नागाव येथील ज्या शाळेत या चित्रपटाचे चित्रीकरण झाले, त्याच शाळेच्या चौकात ट्रेलर अनावरणाचा सोहळा पार पडला. वर्गखोल्या, बाक, फळा आणि मैदान साक्षीदार असलेल्या या ठिकाणी कलाकार आणि उपस्थितांनी पुन्हा एकदा आपल्या शालेय आणि चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा दिला.
‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ या चित्रपटात बंद होत असलेल्या मराठी शाळेची कथा मांडण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये दिसते की, शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना, अनेक वर्षांनंतर त्या शाळेचे माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र येतात आणि आपल्या शाळेला वाचवण्यासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहातात. या पुनर्भेटीत ते आपल्या शालेय आयुष्यातील खोडकरपणा, मैत्री, शिक्षकांची शिस्त, शिक्षा, दंगा-मस्ती आणि निरागस क्षणांना पुन्हा एकदा जगतात. हा ट्रेलर नॉस्टॅल्जियाने भरलेला असून तो प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडत आहे. तसेच हा ट्रेलर मजेशीर, नॉस्टॅल्जिक असतानाच आजच्या काळातील अत्यंत संवेदनशील विषयावर नेमके बोट ठेवताना दिसतो. मराठी शाळा बंद पडण्याच्या चर्चेत असताना, हा चित्रपट मनोरंजनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे आणि मराठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो.
कोकाटेंच्या अटकेची दाट शक्यता; अटक वॉरंटनंतर हायकोर्टात धाव पण तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ महाराष्ट्रातल्या कमी होत जाणाऱ्या मराठी शाळा ही वस्तुस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही एक मजेशीर, भावनिक आणि तरीही वास्तवाशी जोडलेली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या शाळेत शूटिंग केले, तिथेच ट्रेलर अनावरण सोहळा करणे हा आमच्यासाठी खास अनुभव होता. या निमित्ताने आमच्या चित्रीकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना देखील त्यांच्या शाळेची आठवण होईल व मराठी शाळेचे महत्त्व कळेल याची मला खात्री आहे.”
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवलेल्या महिला डॉक्टरने सरकारी नोकरीला लाथ मारून सोडले राज्य
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ १ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे. या ट्रेलर मधून अजून एक सरप्राईज समोर आलंय ते म्हणजे अभिनेत्री निर्मिती सावंत आणि त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.
मजा… मस्ती… धमाल… आणि आठवणींचे गोड रियुनियन!
जणू काळ थांबावा आणि हे सगळं पुन्हा एकदा उभं राहावं… ट्रेलर लाँचच्या निमित्ताने पुन्हा एकदा क्रांतिज्योतीच्या शाळेच्या पटांगणात चित्रपटातील कलाकार आणि संपूर्ण टीम एकत्र जमली आणि रंगली आठवणींची, हसण्याची आणि धमाल मस्तीची मैफल. या खास कार्यक्रमाची सुरुवात चिमुकल्यांच्या गोंडस ‘नाटके मोरा’ या नृत्याने झाली. त्यानंतर रोहित जाधवने आपल्या दमदार आवाजात गायलेलं ‘शाळा मराठी माझी’ गाणं ऐकताना क्षणभर सगळेच आपल्या शालेय दिवसांत हरवून गेले.
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय! गड-किल्ले, स्मारकांवरील अतिक्रमणं रोखण्यासाठी समिती नेमणार
कलाकारांनी मिडियासोबत ‘स्वर्गात आकाशगंगा’ या गाण्यावर थिरकत कार्यक्रमात रंगत आणली. खेळ, गप्पा, हास्य आणि मोकळ्या आठवणी यामुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय झालं. कार्यक्रमाच्या शेवटी चित्रपटातील मुख्याध्यापकांच्या भूमिकेत असलेले सचिन खेडेकर यांनी सगळ्यांना शाळेची सैर घडवली. प्रत्येक वर्ग, प्रत्येक कोपरा जणू काही जुन्या आठवणींचं दार उघडत होता. एकंदरच हा ट्रेलर लाँच सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर पुन्हा एकदा शाळेच्या आठवणींना उजाळा देणारा, मनाला हळुवार स्पर्श करणारा मजा… मस्ती… आणि धमाल अनुभव ठरला.
