राजस्थानात भाजपचा विजय : रहाटकरांची रणनीती ठरली चर्चेची…

राजस्थानात भाजपचा विजय : रहाटकरांची रणनीती ठरली चर्चेची…

जयपूर : राजस्थानमध्ये 199 पैकी तब्बल 115 जागा जिंकत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन करणार आहे. भाजपच्या या विजयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यापासून, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि तळागाळातील एकनिष्ठ कार्यकर्त्यापर्यंत सर्वांचाच समावेश आहे. भाजपच्या याच विजयात महाराष्ट्रातील बड्या नेत्या विजया रहाटकर यांच्या रणनीतीचाही वाटा आहे. (big leader of Maharashtra Vijaya Rahtkar played a role in BJP’s victory in Rajasthan.)

विजया रहाटकर यांची गतवर्षी सप्टेंबर महिन्यात राजस्थानच्या सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही नवीन जबाबदारी मिळताच त्यांनी राजस्थान गाठले आणि काम सुरु केले. मागील वर्षभराच्या काळात क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य असणारे संपूर्ण राजस्थान राज्य पालथा घातला. पायाला भिंगरी लावून 44 पैकी तब्बल 40 जिल्हे फिरुन काढले.

Rajasthan : गेहलोतांची जादू पडली फिकी; रणथंबोर काबीज करणाऱ्या भाजपच्या विजयाची 5 कारणं

रहाटकर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा गड असलेल्या जोधपुर विभागात तळ मांडून ठोकून बसल्या होत्या. इथल्या 33 पैकी तब्बल 24 जागा जिंकून देण्यात त्यांच्या रणनीतीचे मोठे योगदान मानले जाते. कारण 2018 मध्ये भाजपला याच जोधपुर विभागात जेमतेम 11 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आता यापूर्वी राजस्थानात भाजपला यश मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील कै. प्रमोद महाजन, कै गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणे  रहाटकर यांनी भाजपच्या या विजयात मोठा वाटा निभावला आहे, असेच म्हणावे लागेल.

विजया राहटकर यांचा राजकीय प्रवास :

विजया रहाटकर या मुळच्या नाशिकच्या, पण लग्नानंतर त्या आधीचे औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगरच्या रहिवासी झाल्या. मराठवाड्यात आल्यानंतर त्या भाजपच्या युवा मोर्चात काम करु लागल्या आणि इथेच त्यांच्यातील नेतृत्वगुण खऱ्या अर्थाने बहरले. पक्षात काम करत असताना त्यांनी महिला सबळीकरणाच्या कामांना सुरुवात केली. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी मोलाचे काम केले.

महिलांचे काम करत असतानाच रहाटकर यांना महापालिकेत संधी मिळाली. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना काही दिवसांतच महापौर म्हणूनही जबाबदारी दिली गेली. 2009-2010 या अवघ्या वर्षभरासाठीच त्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या महापौर होत्या. पण या कमी कालावधीतही त्यांनी शहरात अनेक नव्या योजना राबवल्या. त्यांच्या या कामाची दखल पक्षानेही घेतली.

Election Results 2023 : 2018 मधील चूक टाळली, मोदी फॅक्टर चालला; 3 राज्यांत भाजप सुस्साट!

महापौर पदानंतर रहाटकर राज्याच्या पातळीवर चमकू लागल्या. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, तत्कालिन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात त्या काम करु लागल्या. या दरम्यान त्यांना नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्या त्यांच्या अनेक प्रकल्पांमध्ये सहभाग घेता आला. महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्यानंतर त्यांची महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून वर्णी लागली.

पुढे राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर रहाटकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. पण महाराष्ट्रात 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत त्या पुन्हा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्या. त्यानंतर गतवर्षी सप्टेंबर महिन्यात राजस्थानच्या सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही जबाबदारी यशस्वीपणे निभावत त्यांनी भाजपसाठी मोलाचे योगदान देत विजयश्री खेचून आणली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube