कोकणात भाजपला धक्का! माजी आमदार हाती बांधणार शिवबंधन; नारायण राणेंवर गंभीर आरोप

कोकणात भाजपला धक्का! माजी आमदार हाती बांधणार शिवबंधन; नारायण राणेंवर गंभीर आरोप

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्याच्या विधासभा निवडणुकीची (Maharashtra Elections) घोषणा निवडणूक आयोगाने केल्यानंतर आता जागावाटपाच्या चर्चा होत आहेत. कोणता मतदारसंंघ कुणाला सुटणार? कुणाला तिकीट मिळणार? यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या याद्या लवकरच जाहीर होतील असेही सांगितले जात आहे. यातच आता भाजपाला धक्का देणारी बातमी आली आहे. कोकणातील भारतीय जनता पार्टीचे माजी  आमदार राजन तेली दोन दिवसांत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या पक्षांतराला खासदार नारायण राणे कारणीभूत ठरत आहेत. भाजपात नारायण राणेंकडून खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप राजन तेली यांनी केला आहे.

साकोलीतून नाना पटोले तर, ब्रह्मपुरीतून वडेट्टीवार?, ‘त्या’ व्हायरल यादीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण 

सध्याचं राजकारण पाहिलं तर राजन तेली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. परंतु, महायुतीत ही जागा शिंदे सेनेकडे जाणार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे घ्यावा अशी मागणी तेली यांनी केली होती. परंतु, पक्ष नेतृत्वाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महायुतीकडून ही जागा मिळण्याची शक्यता कमी असल्याने तेली यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली. तेली यांनी गुरुवारी भाजप सावंतवाडी विभागप्रमुख पद आणि सदस्यपदाचा राजीनामा दिला. यानंतर ते ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तेली यांनी राजीनामा देताना कारणेही सांगितली आहेत. त्यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तेली यांचे राजीनामा पत्र सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे. याच पत्रात त्यांनी राणे कुटुंबियांवर आरोप केले आहेत.

एकाच कुटुंबात दोन विधानसभा एक लोकसभा आणि त्यांच्याच कलेने तिसरी विधानसभा उमेदवारी देणे मला योग्य वाटत नव्हते. मी घराणेशाहीचा स्वीकार करत नाही. राणे कुटुंबियांकडून होत असलेल्या खच्चीकरणामुळे आपण भाजप सोडत असल्याचा दावा राजन तेली यांनी या पत्रात केला आहे. त्यांच्या या निर्णयाने भाजपला कोकणात मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.

नारायण राणेंनी घेतली CM शिंदेंची भेट; निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार?

आपण पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु तरीही राणे कु्टुंबियांकडून आणि पक्षांतर्गत विरोधकांकडून वारंवार अन्याय करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे हा निर्णय घेत आहे. बांदा शहारपुरती मर्यादीत असलेली भाजपाची संघटना जिल्हाभरात वाढविली. ताकद निर्माण केली. मेहनत घेतली. प्रामाणिकपणे काम केले. परंतु, आयत्यावेळी माझे खच्चीकरण करण्यात आले.

2019 मध्ये जिल्हा बँक आणि विधानसभेच्या निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी पक्षांतर्गत विरोधक निर्माण करणे यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करणे असे चुकीचे प्रकार घडले. भाजपात दाखल झालेल्या नारायण राणे कुटु्ंबियांकडून माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. या गोष्टी मी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या. मात्र काहीच कार्यवाही झाली नाही, असेही राजन तेली यांनी या पत्रात म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube