साकोलीतून नाना पटोले तर, ब्रह्मपुरीतून वडेट्टीवार?, ‘त्या’ व्हायरल यादीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी अजून कोणतीही यादी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.

Congress Flag

Candidate’s First List of Congress : राज्याच्या विधासभा निवडणुकीची (Maharashtra Elections) घोषणा निवडणूक आयोगाने केल्यानंतर आता जागावाटपाच्या चर्चा होत आहेत. कोणता मतदारसंंघ कुणाला सुटणार? कुणाला तिकीट मिळणार? यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या याद्या लवकरच जाहीर होतील असेही सांगितले जात आहे. मात्र यातच सोशल मीडियावर काँग्रेसच्या (Congress Party) उमेदवारांची एक यादी व्हायरल होत आहे. याबाबत आता काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी अजून कोणतीही यादी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. लवकरच योग्य त्या माध्यमांद्वारे यादी जाहीर करू असे महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

महाविकास आघाडीची काल मुंबईत मोठी बैठक झाली होती. या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. राज्यातील 288 पैकी 250 पेक्षा जास्त जागांचा तिढा मिटला आहे. राहिलेल्या 25 ते 30 जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही. यातच कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या याचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला 100 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज आहे. तर शरद पवार गट 75 ते 80 जागांवर उमेदवार देतील अशी शक्यता आहे.

 

जागावाटपावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. 250 पेक्षा जास्त जागांवरील तिढा मिटल्याचे सांगितले जात असले तरी अंतर्गत काय चर्चा झाली याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडून अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही. महाविकास आघाडीची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आदींसह मविआतील अन्य प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

महाविकास आघाडीचे जागावाटप शुक्रवारपर्यंत होईल असा अंंदाज विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे कदाचित आज दिवसभरात बैठकीनंतर जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जागावाटप निश्चित झाल्यानंतर साधारण 20 ऑक्टोबरला पहिली यादी येण्याची शक्यता आहे. या दिवशी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असल्याने याच दिवशी पहिली यादी जाहीर होऊ शकते असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

follow us