वळसे पाटील अजितदादांसोबत का गेले?; लेक पूर्वा वळसे पाटलांची पोस्ट चर्चेत
मंचर : विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात असून, एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये सहकार मंत्री आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या लेकीच्या फेसबुक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यात पूर्वा वळसे पाटील यांनी राज्यात घडलेल्या मोठ्या उलथापाथीनंतर घडलेल्या घडामोडींवर प्रकाश टाकला आहे.
वळसे पाटलांचं शिरुरवर लक्ष; गावभेटी अन् सभांचा धडाका, नागरिकांशी संवाद..
पूर्वा वळसे पाटलांची पोस्ट नेमकी काय?
पूर्वा वळसे पाटील यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात की, त्यादिवशी राज्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ झाली आणि एकनिष्ठतेचे, प्रामाणिकपणाचे आणि सचोटीचे प्रतीक म्हणून राज्यभरात ख्याती असणाऱ्या दिलीप वळसे पाटील आपल्या अनेक सहकाऱ्यांसोबत सत्तेत सहभागी झाले आणि अचानकपणे त्यांच्या पस्तीस वर्षांच्या निष्ठेवर, प्रामाणिकपणावर आणि एकूणच नैतिकतेवर भले मोठे प्रश्नचिन्ह उभे केले गेले.
सत्तेत सहभागी झाल्यानंतर लगेचच त्यांनी मंचरला एक जाहीर मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. “डिंभे धरणाच्या तळाशी बोगदा पाडून ते पाणी कर्जत -जामखेडला नेण्याचा घाट काही लोकांनी घातला आहे. त्यामुळे आपले डिंभे धरण तीन महिन्यातच रिकामे होणार आहे, त्यामुळे पुढचे सहा महिने आपल्याला शेतीला पाणी राहणार नाही, आंबेगाव तालुक्याला पुन्हा १९९० पूर्वीचे दुष्काळी दिवस बघायला लागतील, ही सुबत्ता राहणार नाही असे साहेब त्यावेळी आपल्या भाषणात म्हणाले. या विरोधात मला आपल्याच लोकांकडून सहाय्य न झाल्याने नाईलाजास्तव हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. यासाठी मी माझ्या आमदारकीचा त्याग सुद्धा करायला तयार होतो, पण त्यांनी ऐकले नाही.”
Dimbhe Dam : आंबेगाव तालुक्यातील जनता कधीही बोगदा होऊन देणार नाही, वळसे पाटील आक्रमक
साहेब भावनिक झाले, आदरणीय पवार साहेबांपासून दूर गेल्याची सल त्यांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये दिसत होती. त्यांनी आपल्या तालुक्यातील जनतेला अंतकरणापासून स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला. ज्यांना साहेब माहित आहेत त्यांना ही गोष्ट पटली, त्यांनी विश्वास ठेवला परंतु काही लोकांना मात्र ही गोष्ट खोटी वाटली. विरोधकांना साहेबांना बदनाम करण्याची ही नामी संधी वाटू लागली. त्यांनी या गोष्टीची खिल्ली उडवली. तुम्हाला ईडी किंवा सीबीआयची नोटीस आली असेल म्हणून तुम्ही घाबरून हे पाऊल उचलले असेल असे ते लोक म्हणू लागले. एखाद्या मोठ्या भ्रष्टाचारात तुमचे नाव आले असेल अशा देखील अफवा काहींनी पसरवल्या. अनेक प्रकारचे गलिच्छ आरोप केले, ‘गद्दार – गद्दार’ म्हणून हिणवले, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्या.
वळसे पाटील साहेबांनी इतके वर्ष कमावलेल्या नावाला, प्रतिष्ठेला डाग लागावा अशी परिस्थिती काही लोकांनी जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. २०१८ साली तुम्हीच या बोगद्याला परवानगी दिली होती असा जावईशोध सुद्धा काही लोकांनी लावला. त्यांना देखील हे माहीत आहे की, तेंव्हा आदरणीय साहेबांनी धरणाच्या पूर्णसंचय पातळीपासून बोगद्यास सहमती दर्शवली होती.
आपल्या तालुक्याची गरज पूर्ण होऊन अधिकचे पाणी देण्यास आपण माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपली कधीही हरकत नव्हती. परंतु प्रत्यक्षात मात्र पूर्णसंचय पातळीच्या शंभर फूट खाली म्हणजेच तळापासून १ मीटरवर बोगद्याचा प्रस्ताव कसं काय पुढे आला, याचा कोणी का विचार करत नाही? ही तफावत लक्षात येऊन देखील जाणीवपूर्वक लोकांचा बुद्धिभेद करण्याचा का प्रयत्न होत आहे?? बर साहेबांचे २०१८ चे पत्र दाखवणारी लोक त्यांचे १० मार्च २०२१ चे “तळातून बोगद्याला स्पष्ट शब्दात विरोध” करणारे पत्र का दाखवत नाहीत? की मग या सर्व गोष्टींमागे वळसे पाटील साहेबांचे चारित्र्यहनन करणे हाच एकमेव अजेंडा होता? याचा देखील आज विचार व्हायला हवा!
बच्चू कडूंच्या ‘प्रहार’चा वळसे पाटलांना पाठिंबा; विकसनशील नेतृत्व म्हणत आंबेगावात ताकद वाढवली
आम्हा सर्व कुटुंबीयांना विशेषत: साहेबांची मुलगी म्हणून या सर्व गोष्टींचा माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. शेवटी माझ्या देखील आयुष्यात आदरणीय पवार साहेब आणि सुप्रिया ताईंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्याशिवाय वळसे पाटील साहेबांचे राजकारण असेल असा विचार आम्ही देखील कधीच केला नव्हता. तरीही तालुक्याच्या हितासाठी वळसे पाटील साहेबांना काळजावर दगड ठेऊन हा निर्णय घ्यावा लागला हे आम्हाला मनोमन माहित आहे. परंतु तालुक्यातील जनतेशी राखलेल्या इमानाची एवढी मोठी किंमत आम्हाला मोजावी लागेल असे आम्हा कोणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. आदरणीय साहेबांची या दरम्यान होत असणारी घालमेल आम्हाला अजुनही बघवत नाही.
आम्ही सर्वजण गेले अनेक महिन्यांपासून लोकांपर्यंत सहेबांच्या या निर्णयामागचे सत्य पोहोचवण्याचा जीवापाड प्रयत्न करीत आहोत. विविध बैठका, कोपरा सभा, वैयक्तिक गाठीभेटी यांमधून लोकांपर्यंत हे सत्य पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु शेवटी ‘भगवान के घर देर है, अंधेर नही!’ या वाक्याचा मला आज प्रत्यय आला. मी आज पोस्ट करीत असलेल्या या व्हिडिओतील दोन्हीही लोकांच्या वक्तव्यांवरून वस्तुस्थिती स्पष्ट होत आहे. आता आपल्याला अजून काही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही.
“डिंभे धरणाला बोगदा आम्ही करणारच आहोत”, असे वक्तव्य या व्हिडिओतून ऐकल्यानंतर तालुक्यातील जनतेला आता मात्र या गोष्टीचे गांभीर्य समजले असेल. “डिंभे धरणाच्या बोगद्याचा सर्व्हे झालेला आहे”, असे वक्तव्य देखील या व्हिडिओतून समोर येत आहे. शेवटी मा. वळसे पाटील साहेबांनी आपली सगळी शक्ती वापरून, राजकीय संबंध आणि अनुभव वापरून, सातत्याने पाठपुरावा करून हा बोगदा शासकीय निर्णयाने रद्द केलेला आहे. परंतु अद्यापही काही लोकांना ही बाब पचनी पडली नाही.
“आपल्या मतदारसंघात आमच्या धरणातले पाणी न्यायचेच आणि आंबेगाव तालुक्याला दुष्काळ दाखवायचाच” असा चंगच जणू त्यांनी बांधलेला दिसतो आहे. परंतु आता जनतेसमोर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या व्हिडिओ नंतर आंबेगाव शिरूरच नाही तर राज्यातील नागरिकांचे देखील डोळे उघडले आहेत. आदरणीय वळसे पाटील साहेब खोटे बोलत नाही एवढं तरी परमेश्वर कृपेने लोकांच्या समोर आले आहे. आणि इतके दिवस लोकांना जे सत्य आपण पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो, ते सत्य आज त्यांच्या स्वतःच्याच व्हिडिओतून लोकांच्या समोर आले आहे.
सरतेशेवटी मला एकच सांगायचे आहे की, मा. वळसे पाटील साहेबांनी गेल्या पस्तीस वर्षांमध्ये अनेक मोठमोठी पदे भूषविली, राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात अमुलाग्र बदल व्हावा यासाठी अनेक व्यापक जनहिताचे निर्णय घेतले. आंबेगाव तालुक्याच्या जनतेच्या जीवनमान उंचावण्यासाठी सतत आयुष्यभर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु त्यांनी त्यातून कधीही वैयक्तिक हित साध्य करण्याचा प्रयत्न देखील केला नाही, त्यांच्यावर आजवर कुठलाही भ्रष्टाचाराचा किंचितसा देखील डाग नाही, कुठेही चुकीची प्रतिक्रिया दिली नाही, आज त्यांची मुलगी म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही पुरावा सोडा साधा आरोप देखील नाही.
आजपर्यंत कधीही पक्षहिताला किंवा समाजहिताला बाधा पोहोचेल असे कणभर देखील वर्तन त्यांच्याकडून झालेले नाही. परंतु आज आंबेगाव शिरूर तालुक्याच्या अवकाशामध्ये डिंभे धरणाच्या पाण्याच्या लुटीच्या संकटाचे जे ढग गडद होत आहेत, त्या विरुद्ध जर मा. वळसे पाटील साहेबांनी ही ठोस भूमिका घेतली नसती तर आपल्या तालुक्याला पुन्हा एकदा भायानक दुष्काळ बघावा लागला असता, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि लोकहितासाठी त्यांनी दिलेली ही अग्निपरीक्षा आहे. आजच्या या व्हिडिओमुळे ‘दूध का दूध और पानी का पानी’ झाले आहे.
आता माझी आपणा सर्व सुज्ञ बंधू-भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक यांना हीच नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी कृपया वस्तुस्थिती समजावून घेऊन, व्यावहारिक दृष्टिकोनातून आणि डोळे उघडे ठेवून या विषयाकडे बघावे आणि त्याचे आपल्या तालुक्यावर होणारे दुरगामी परिणाम गांभीर्याने समजून घ्यावेत, मित्रांनो निवडणुका येतील आणि जातील परंतु आपल्या धरणाचे पाणी एकदा गेल्यावर पुन्हा येणार नाही. म्हणुन या निकराच्या लढाईत वळसे पाटील साहेबांसोबत आपण सर्वांनी ठामपणे उभे रहावे ही आपणा सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती असल्याचे पूर्वा दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.