उमेदवारांना पोलिसांच्या गाड्यांमधून रसद; सरकारी अधिकाऱ्यांचा उल्लेख करत पवारांचा मोठा आरोप
Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पोलिसांकडून देखील आदर्श आचारसंहिते दरम्यान कारवाई करत मोठी रक्कम जप्त करत आहे. पोलिसांनी कारवाई करत मुंबई, पुणे, नगरसह राज्यातील अनेक ठिकाणांहून मोठी रक्कम जप्त केली आहे. यावरून महाविकास आघाडीचे (MVA) नेते राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गोविंद बागेत दिवाळी पाडवा कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना महायुतीच्या उमेदवारांना पोलीस दलाच्या गाड्यांमधून रसद पुरवली जात आहे. असा आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, या सरकारचं वैशिष्ट्य आहे. सरकारने विमानाने एबी फॅार्म पाठवले. पोलीस दलाच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे. हे मी जाहीरपणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये, अशी गळ घातली आहे. असं माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले.
कुटुंबाची परंपरा कायम राहिली असती तर मला आनंदच झाला असता
अजित पवार शरद पवार यांच्या दिवाळी पाडवा कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने शरद पवार म्हणाले की, एकत्र दिवाळी साजरी करण्याची पवार कुटुंबाची परंपरा आहे. ती कायम राहिली असती तर मला आनंदच झाला असता. अजित पवार सोडले तर बाकी सगळे गोविंद बागेत हजर होते. त्यांच्या बहिणी देखील होत्या. त्यांचे भाऊ देखील असतातच. अजित पवार यांना वेळ मिळाला नसेल पण बाकीचे सर्व आले. 1967 पासून पवार कुटुंबीय एकत्रित दिवाळी साजरी करतात. परंतु. यावेळचं चित्र वेगळं होतं. शरद पवार आणि कुटुंबियांनी गोविंद बागेत दिवाळी साजरी केली तर अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यातील काटेवाडी या त्यांच्या गावी दिवाळी साजरी केली.
आर. आर. पाटील स्वच्छ राजकारणी
अजित पवार यांनी काही दिवसांपू्र्वी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या संदर्भात बोलणे योग्य नाही. आर. आर. पाटील स्वच्छ राजकारणी म्हणून राज्यात नाही तर देशात प्रसिद्ध होते आर. आर. पाटील यांच्या बाबतीत असे काही घडायला नको होते. परंतु, सत्ता असली की अशा पद्धतीने वापर केला जातो. काहीही बोलले जाते, असे शरद पवार म्हणाले.
‘धर्म बघून अन्नदान करणाऱ्या…’, शाहरुख खानबद्दलची किरण मानेंची पोस्ट व्हायरल
आम्ही सिंचन घोटाळ्याचा उल्लेख कधी केला नाही. हा प्रश्न कुणी काढला हे सांगण्याचीही गरज नाही. राज्याच्या राजकारणातील सर्वात स्वच्छ व्यक्ती म्हणून आर. आर. पाटील यांचा लौकिक होता. ते उत्तम प्रशासक होते. त्यांच्या बाबतीत अशी उलटसुलट चर्चा होणं अशोभनीय आहे अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.