एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासाठी 31 मार्चपर्यंत 50 टक्के सवलत; आशिष शेलारांनी स्वीकारला अध्यक्षपदाचा पदभार

एन. डी. स्टुडिओतील विविध सुविधा आणि चित्रिकरणाच्या ठिकाणांच्या शुल्कात 31 मार्च 2027 पर्यंत तब्बल 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

News Photo   2026 08 17T213353.023

महाराष्ट्र शासनाने परिचालनासाठी घेतलेल्या (Entertainment) कर्जत येथील एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज पदभार स्वीकारला. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या संचालक मंडळाचे ते पहिले अध्यक्ष ठरले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी आणि निर्मात्यांचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

एन. डी. स्टुडिओतील विविध सुविधा आणि चित्रिकरणाच्या ठिकाणांच्या शुल्कात 31 मार्च 2027 पर्यंत तब्बल 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.  त्यामध्ये थीम पार्कच्या प्रवेश शुल्कासह चित्रिकरणासाठी उपलब्ध विविध स्थळे, निर्माते, कलाकार, कलादिग्दर्शक तसेच इतर मान्यवरांसाठी उपलब्ध निवासव्यवस्थेच्या शुल्काचा समावेश आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना निर्मिती खर्चात मोठी बचत होणार असून, अधिकाधिक चित्रपट व दृकश्राव्य निर्मितींना एन. डी. स्टुडिओकडे आकर्षित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

एन. डी. स्टुडिओमध्ये मराठीसह हिंदी आणि इतर भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, वेबसीरिज तसेच विविध दृकश्राव्य निर्मितींचे चित्रिकरण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. वाढत्या चित्रपट निर्मिती खर्चाच्या पार्श्वभूमीवर स्टुडिओ, लोकेशन आणि निवासाचा खर्च हा निर्मात्यांसाठी महत्त्वाचा घटक ठरतो. त्यामुळे या सवलतीमुळे निर्मात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

लवकरच अभिनेता आदिनाथ कोठारे दिसणार एका नव्या भूमिकेत !

बैठकीत एन. डी. स्टुडिओचा केवळ चित्रिकरणासाठी वापर न करता चित्रपट निर्मिती, मनोरंजन आणि सांस्कृतिक पर्यटनाच्या दृष्टीने त्याचा अधिक प्रभावी विकास करण्यावरही चर्चा झाली. स्टुडिओतील चित्रिकरण स्थळे, पायाभूत सुविधा, निवासव्यवस्था आणि थीम पार्कचा अधिकाधिक वापर होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला. एन. डी. स्टुडिओला महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याचे संकेत देण्यात आले.

या निर्णयामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर चित्रिकरणाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ, कामगार आणि विविध सेवा क्षेत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्राला देशातील प्रमुख चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य वित्तीय अधिकारी चित्रलेखा खातू यांच्यासह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एन. डी. स्टुडिओवरील 50 टक्के सवलतीचा निर्णय 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहणार आहे.

Tags

follow us