Bol Bol Rani : ‘बोल बोल राणी’ : दिसतं तसं नसतं, म्हणून तर…

Bol Bol Rani : "आगीत काय जळालं, ते राखेलाच माहित..." इथपासून सुरू झालेला हा प्रवास एक वर्तुळ...तीन कोन...सत्य सांगू की राखू मौन...

Bol Bol Rani

Bol Bol Rani : “आगीत काय जळालं, ते राखेलाच माहित…” इथपासून सुरू झालेला हा प्रवास एक वर्तुळ…तीन कोन…सत्य सांगू की राखू मौन… या वाक्यापर्यंत येऊन थांबतो… हा केवळ चित्रपटातील पहिला आणि अखेरचा संवाद नाही. तो संपूर्ण चित्रपटाचा तात्त्विक केंद्रबिंदू लेखक दिग्दर्शकाने मानून त्याभोवती तो फिरत राहतो… आग कधीच स्वतःची कथा सांगत नाही. ती विझल्यानंतर उरलेली राखच तिचा इतिहास जपते, पण राखही नेहमी सत्य सांगतेच असं नाही. ती फक्त जळल्याचा पुरावा देते; काय जळलं, कोण जळलं आणि का जळलं, हे मात्र कायमच संदिग्ध राहतं… ‘बोल बोल राणी’ हा नेमक्या याच संदिग्धतेचा चित्रपट आहे.

दिग्दर्शक सिड विंचुरकर यांचा पहिलाच चित्रपट असूनही त्यात प्रचंड महत्त्वाकांक्षा दिसते. हा सिनेमा रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत नाही; तो सत्य ही संकल्पनाच संशयास्पद आहे, असा प्रश्न उपस्थित करतो. त्यामुळे हा पारंपरिक “Who Dunnit?” रहस्यपट नाही; तर “Who Owns the Truth?” हा प्रश्न विचारणारा मानसशास्त्रीय सिनेमा आहे.

राशोमोनपासून बोल बोल राणीपर्यंत … सत्याची वेगवेगळी versions… एका खुनाची तीन वेगवेगळी कथनं… साहित्य आणि सिनेमात ही रचना नवीन नाही. अकीरा कुरोसावा यांच्या राशोमान Rashomon ने या कथनपद्धतीला जागतिक सिनेमात वेगळी ओळख आणि मान्यता दिली… त्यानंतर Courage Under Fire, Hero, The Last Duel, Gone Girl आणि भारतीय सिनेमात Virumaandi सारख्या चित्रपटांनी सत्याच्या बहुरूपी स्वरूपाचा वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेतला…

मात्र या सर्व चित्रपटांमध्ये प्रत्येक कथन मानवी स्वभावाचा नवा स्तर उलगडतं. ‘बोल बोल राणी’मध्ये मात्र कथनं पुढे जातात; पण माणसं अधिक उलगडत नाहीत. उलट ती अधिक अस्पष्ट… धूसर … होत जातात. ही अस्पष्टता दिग्दर्शकाचा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असू शकतो, पण चित्रपटाच्या अखेरीस जेव्हा प्रेक्षकाकडे प्रश्नच अधिक उरतात आणि भावनिक निष्कर्ष कमी… तेव्हा गूढता आणि अपूर्णता यांच्यातली सीमारेषा धूसर होते…

प्रकाश, सावल्या आणि रिकाम्या जागांचं कथन…

या चित्रपटाची खरी भाषा संवाद नाही. ती म्हणजे प्रकाश. ती म्हणजे सावल्या. ती म्हणजे फ्रेममध्ये दिसणाऱ्या रिकाम्या जागा. छायाचित्रकार विवियन पुल्लन यांनी प्रत्येक फ्रेममध्ये प्रकाशाचा वापर माहिती देण्यासाठी नाही, तर माहिती लपवण्यासाठी केला आहे. अर्धवट दिसणारे चेहरे…बंद दरवाजे…खिडकीतून येणारा प्रकाश… कॉरिडॉरमधील अंधार…या सर्व गोष्टी कथानकाइतक्याच महत्त्वाच्या ठरतात. चित्रपटातील अनेक फ्रेम्स पाहताना इंगमार बर्गमन, डेव्हिड फिंचर किंवा डेव्हिड लिंच यांच्या मानसशास्त्रीय दृश्यभाषेची आठवण येते. मात्र त्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये दृश्य आणि आशय यांच्यात अखंड संवाद असतो. येथे अनेकदा दृश्यांची ताकद कथेला मागे टाकते.

माया : व्यक्तिरेखा की प्रतीक?

या चित्रपटातील सर्वात मोठा प्रश्न “खून कोणी केला?” हा नाही.

खरा प्रश्न आहे… माया कोण आहे? ती स्त्री आहे? ती पुरुषांच्या अपराधी मनाची निर्मिती आहे? की ती प्रत्येक कथनात बदलणाऱ्या सत्याचं रूपक आहे? सई ताम्हणकरची माया ही प्रत्यक्ष व्यक्तिरेखेपेक्षा प्रतीक म्हणून अधिक प्रभावी ठरते. एका कथनात ती असहाय आहे. दुसऱ्यात ती धोकादायक आहे. तिसऱ्यात ती परिस्थितीवर नियंत्रण ठेवणारी शक्ती आहे. यामुळे माया ही एक व्यक्ती राहत नाही; ती पुरुषांच्या नजरेतून बदलत जाणाऱ्या स्त्रीप्रतिमेचं रूपक बनते.

मानसशास्त्र : सत्य… स्मृतीत दडलेलं की निर्माण केलेलं…

चित्रपटाचा सर्वात रंजक स्तर मानसशास्त्रीय आहे. मानवी स्मृती ही कॅमेऱ्यासारखी वास्तव टिपत नाही.ती सतत स्वतःला बदलत राहते. प्रत्येक व्यक्ती स्वतःला दोषमुक्त दाखवण्यासाठी भूतकाळ नव्यानं लिहित असते. Psychology मध्ये याला Reconstructive Memory म्हणतात. चित्रपटातील तीन कथनं ही कदाचित घटनांची तीन आवृत्ती नसून तीन अपराधी मनांची आत्मसमर्थनं असू शकतात. ही कल्पना चित्रपटाला अधिक गहन बनवते, पण ही कल्पना पूर्ण ताकदीने विकसित होत नाही.

पटकथा : प्रश्न विचारण्याची हिंमत… उत्तर देण्याची भीती?

पटकथेचा पहिला अर्धा भाग जवळजवळ निर्दोष वाटतो. रहस्य हळूहळू उलगडतं. पात्रं बदलतात आणि विश्वास ढासळतो. मध्यंतरापूर्वीचा प्रसंग तर संपूर्ण चित्रपटातील सर्वात प्रभावी क्षण आहे. पण उत्तरार्धात पटकथा जणू स्वतःच्याच भूलभुलैय्यात हरवते…. चित्रपट उत्तरं देण्याचे टाळतो. हे काहीवेळा कलात्मक असतं…पण प्रत्येक प्रश्न अनुत्तरित ठेवणं म्हणजे प्रेक्षकाला विचार करायला लावणं नव्हे. कधी कधी ते लेखकाच्या डिफेन्स मेकॅनिझमचे लक्षण असू शकतं.

रंगमंचाचा प्रभाव : शब्द जिंकतात, पण पडद्यावर प्रतिमा अधिक बोलतात

हा चित्रपट राज्य पुरस्कारप्राप्त ‘आणखी एक नारायण निकम’ या नाटकावर आधारित असल्यामुळे त्यात रंगमंचाचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. संवादप्रधान प्रसंग… मर्यादित अवकाश… पात्रांवर आधारित संघर्ष… हे सर्व नाटकात प्रभावी ठरतं. पण सिनेमा प्रतिमांचं माध्यम आहे. इथे प्रत्येक दृश्य कथेला पुढे नेणं आवश्यक असतं. काही ठिकाणी ‘बोल बोल राणी’ दृश्यरचनेत इतका रमतो की कथा एक बाजूला स्थिरावल्यासारखी वाटते.

सई ताम्हणकर : कारकिर्दीतील सर्वाधिक गुंतागुंतीचा अभिनय

सई ताम्हणकरचा अभिनय या चित्रपटाचा आत्मा आहे. ती मोठे संवाद बोलत नाही. ती डोळ्यांनी अभिनय करते. तिच्या नजरेत सतत एक न सांगितलेलं रहस्य आहे. तिच्या शांततेतही संवाद आहेत. ती एकाच चित्रपटात तीन वेगळ्या व्यक्तिमत्त्वांना वेगवेगळा श्वास देते. हे तिच्या अभिनयातील सूक्ष्म नियंत्रणाचं उदाहरण आहे.

चिन्मय मांडलेकरने अपराधीपणा आणि असुरक्षितता यांच्या सीमेवर उभ्या असलेल्या पुरुषाची मनःस्थिती अचूक पकडली आहे. त्याचे विकत होणे तिन्ही भूमिकांमधला वेगळेपणा ठाशीवपणे अधोरेखित होतो. संभाजी ससाणेचा अभिनयही कथानकाला आवश्यक असलेली अस्थिरता देतो… संभाजी हे एक सरप्राइज पॅकेज आहे. हा चेहरा येत्या काळात निश्चितच आपला ठसा उमटवेल याची झलक देतो. त्याची तिन्ही व्यक्तिरेखांमधील देहबोली सादरीकरण नजरेत भरतं…

सुबोध भावे संयत आहे; मात्र त्यांची व्यक्तिरेखा प्रेक्षक आणि कथानक यांच्यातील निरीक्षक म्हणूनच अधिक कार्य करते. भूमिका छोट्या असल्या तरी माधुरी भारती आणि पद्मनाभ बिन्ड हे दोघेही कलावंत आपली छाप पडतात…

ध्वनी : जिथे शांतताच सर्वात मोठा संवाद ठरते

ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं संगीत या चित्रपटात भावना अधोरेखित करताना …भावनांच्या वेगवेगळ्या छटा तयार करतं… ती त्याची खरी ताकद आहे… काही प्रसंगांमध्ये शांतता अधिक प्रभावीपणे बोलते…इथे शांतता निर्वात पोकळी नाही… ती गहन आहे…ती अर्थपूर्ण आहे…. त्यामुळे विचार करायला भाग पाडते… अखेरीस… ‘बोल बोल राणी’ हा सर्वांसाठी बनलेला चित्रपट नाही. तो संयम मागतो. तो निरीक्षण मागतो. तो प्रेक्षकाला निष्क्रिय ठेवत नाही; सतत अर्थ शोधायला भाग पाडतो. पण उत्कृष्ट कलाकृती केवळ प्रश्न विचारत नाही; ती त्या प्रश्नांच्या प्रतिध्वनीला प्रेक्षकाच्या मनात दीर्घकाळ जिवंत ठेवते. ‘बोल बोल राणी’मध्ये प्रतिध्वनी आहे; परंतु त्याचा स्वर काहीसा अपुरा राहतो.

काही चित्रपट उत्तरं देतात. काही प्रश्न विचारतात. ‘बोल बोल राणी’ प्रश्नांच्या जंगलात घेऊन जातो; मात्र त्या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग प्रत्येक प्रेक्षकाने स्वतःच शोधायचा आहे. आणि कदाचित, हाच त्याचा सर्वात मोठा गुण आणि सर्वात मोठा दोषही आहे.

का पाहावा –

दृश्यभाषेची ताकद, उत्कृष्ट अभिनय, अस्वस्थ करणारी ध्वनिरचना आणि महत्त्वाकांक्षी दिग्दर्शन यामुळे हा वेगळा प्रयोग म्हणून नक्कीच लक्षात राहतो.

का टाळावा

शैली आणि आशय यांच्यातील नाजूक संतुलनात तिथे शैलीचं पारडं जड झाल्यानं तो अपेक्षित प्रभाव निर्माण करत नाही…

थोडक्यात काय

प्रश्नांच्या चक्रव्यूहात सिनेमाच अभिमन्यू होतो तेंव्हा….

⭐⭐⭐(3/5)

‘बोल बोल राणी’:-

दिग्दर्शक आणि निर्माता: सिड विंचूरकर

निर्मिती संस्था: न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड, कथा वाचन

निर्माते: अपूर्वा मोतीवाले सहाय, सिड विंचूरकर

कथा व पटकथा: सौरभ भावे, हिमांशू निम्भोरकर

संगीत: ए. व्ही. प्रफुल्लचंद्र

संकलन : अपूर्वा मोतीवाले सहाय

सिनेमॅटोग्राफर : व्हिव्हियन पुलन

कलाकार:

सुबोध भावे
सई ताम्हणकर
चिन्मय मांडलेकर
संभाजी ससाणे

follow us