माजी पंतप्रधानांचा सल्ला अन् 24 तासांत चित्रपटच लिहीला; मनोजकुमारांचा खास किस्सा वाचाच..

Manoj Kumar Death : हिंदी सिनेमा जगतातील दिग्गज अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोजकुमार यांचं (Manoj Kumar Death) निधन झालं. चित्रपट सृष्टीत अतुलनीय योगदान देणारे मनोजकुमार त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांमुळे ओळखले जायचे. त्यांचं खरं नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असलं तरी त्यांनी बॉलीवूडमध्ये भारतकुमार या नावाने ओळख बनवली. मनोजकुमार यांचा खास किस्सा यानिमित्ताने आठवतो. 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू होतं. याच दरम्यान तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान अशी घोषणा दिली होती.
या युद्धात भारतीय सैनिक त्वेषाने लढले आणि पाकिस्तानला पाणी पाजलं. या विजयानंतर योगायोगानेच म्हणायला हवं पण लाल बहादूर शास्त्री आणि मनोजकुमार यांची दिल्लीत भेट झाली. याच भेटीत शास्त्रींनी त्यांना जवान आणि किसान यांना मिळवून एखादा चित्रपट तयार करा असे सुचवले. खरंतर मनोजकुमार त्यावेळी म्हणजेच 1965 मध्ये शहीद या चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये सहभागी झाले होते. याच स्क्रिनिंगवेळी लाल बहादूर शास्त्री देखील उपस्थित होते. दोघांची भेट झाली. गप्पा सुरू झाल्या. त्याचवेळी शास्त्री म्हणाले की सेना आणि समाजावर चित्रपट बनतात पण देशातील कोट्यावधी जनतेचे भरणपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कधीच चित्रपट येत नाही.
ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन; ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
फक्त 24 तासांतच लिहीली चित्रपटाची कथा
लाल बहादूर शास्त्री यांचे हे बोल ऐकून मनोजकुमार स्तब्ध झाले. त्यांचे शब्द कानात घुमू लागले. त्यांनी तिथल्या तिथेच आश्वासन दिलं की मी शेतकऱ्यांवर नक्कीच चित्रपट बनवील. यानंतर मनोजकुमार थेट मुंबईत आले. दिल्ली ते मुंबई या 24 तासांच्या प्रवासात त्यांनी सेना अणि शेतकऱ्यांवर आधारीत चित्रपटाची कथा लिहीली. या चित्रपटाचं नाव उपकार असे ठेवले.
उपकार ठरला ब्लॉकबस्टर
मनोजकुमार यांचा उपकार हा चित्रपट 1967 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटात आशा पारेख, प्रेम चोपडा यांच्यासह अन्य कलाकार होते. चित्रपटाला प्रचंड यश मिळालं. त्यावेळी या चित्रपटाने 6.80 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग 7.6 असे आहे. या चित्रपटातील मेरे देश की धरती गाणं आजही लोकांच्या मनात आहे. देशभक्तीचं गाणं कुठेनाकुठे ऐकू येतंच इतकी या गाण्याची ताकद आजही आहे. प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांनी ही गीत गायलं होतं.