उज्वला गौड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ‘मनाचे श्लोक’ सिनेमा प्रकरण
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा मनाचे श्लोक हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बंद पाडला.

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेचा (Manache Shlok) ‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटाला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विरोध केला. काल पुण्यातील अभिरुची थिएटकमध्ये या चित्रपटाचा शो सुरु होता. हिंदू संघटनेशी संबंधीत असलेल्या उज्वला गौड यांनी काही कार्यकर्त्यांसोबत मिळून या चित्रपटाचा शो बंद पाडला. मात्र, असं करणं त्यांना चांगलेच भोवलं आहे.
गौड यांच्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील अंलकार पोलिस ठाण्यात उज्वला गौड यांच्याविरोधात मनाचे श्लोक सिनेमा बंद पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि थिएटरमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसात गोंधळ घातल्याचा आरोप उज्वला गौड यांच्यावर करण्यात आला आहे.
मनाचे श्लोक हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. काल, पुण्यातील अभिरुची थिएटरमध्ये या चित्रपटाचा शो सुरु होता. त्यावेळी उज्वला गौड या काही कार्यकर्त्यांसोबत चित्रपटाचा शो बंद पाडण्यासाठी गेल्या होत्या. थिएटरमध्ये गोंधळ घालतानाचे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनेकांनी त्यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या. आता उज्वला गौड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चित्रपटाला पुण्यातून विरोध होत आहे. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर चित्रपटासाठी केल्यामुळे नव्या मराठी चित्रपटावर वादंग निर्माण झाला आहे. हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवला असून, हा हिंदूंच्या श्रद्धेचा “बाजार मांडण्यासारखा प्रकार” असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी पुण्यातील कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपट कार्यकर्त्यांनी चालू शो मध्ये गोंधळ घालत शो बंद पडला होता.