ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; वाचा, रंगभूमीपासून ‘KGF’पर्यंतचा प्रदीर्घ प्रवास
Actor Anant Nag : रंगभूमीवरील अनुभवातून अभिनयाचा पाया मजबूत झाल्यानंतर अनंत नाग यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना वर्ष 2024 चा प्रतिष्ठित (Award) दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. कन्नडसह हिंदी, मराठी आणि इतर भारतीय भाषांतील चित्रपटांमध्ये आपल्या अष्टपैलू अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अनंत नाग यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा हा महत्त्वाचा सन्मान मानला जात आहे. डॉ. राजकुमार यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे कन्नड अभिनेते ठरले आहेत.
अनंत नाग यांचा जन्म 4 सप्टेंबर 1948 रोजी कर्नाटकातील शिराली येथे झाला. त्यांचं पूर्ण नाव अनंत नागरकट्टे असून, कोकणी भाषिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे धाकटे बंधू प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक शंकर नाग होते. बालपणी धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात वाढलेल्या अनंत नाग यांचं प्राथमिक शिक्षण कर्नाटकातील विविध ठिकाणी झालं. नववीत असताना ते मुंबईत आले आणि सुमारे 8 वर्षे हौशी मराठी नाट्यचळवळीत काम केलं.
रंगभूमीवरील अनुभवातून अभिनयाचा पाया मजबूत झाल्यानंतर अनंत नाग यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ या चित्रपटातून त्यांच्या हिंदी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘कोंडुरा’ आणि ‘कलयुग’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. सहज अभिनय, संवेदनशीलता आणि व्यक्तिरेखेला न्याय देण्याची क्षमता यामुळे त्यांनी कन्नड चित्रपटसृष्टीत आघाडीचे अभिनेते म्हणून स्वतंत्र स्थान निर्माण केलं.
सेन्सॉर बोर्डात मोठे बदल! केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची पुनर्रचना; 18 सदस्यांचा समावेश
अनंत नाग यांनी गंभीर आणि संवेदनशील भूमिकांसोबतच विनोदी व्यक्तिरेखाही प्रभावीपणे साकारल्या. ‘गणेशना मदुवे’, ‘गौरी गणेशा’, ‘उद्भव’, ‘अनोहोदा कोंडुहोडा’ आणि ‘यारिगे हेलबेडी’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या विनोदी भूमिका लोकप्रिय ठरल्या. त्यांचे बंधू शंकर नाग यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मालगुडी डेज’ या मालिकेतही त्यांनी लक्षवेधी भूमिका केली. कन्नड, कोकणी, मराठी, हिंदी, तेलुगू आणि मल्याळम भाषांचं ज्ञान त्यांच्या अभिनयासाठी उपयुक्त ठरलं.
नव्या पिढीतील प्रेक्षकांमध्ये अनंत नाग यांची ओळख अधिक ठळक झाली ती ‘KGF: Chapter 1’ या चित्रपटामुळे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक आनंद इंगलागी यांची भूमिका साकारली. कथानकाचा सूत्रधार म्हणून त्यांच्या आवाजाने आणि निवेदनशैलीने चित्रपटाला वेगळी परिणामकारकता मिळाली. याशिवाय भारत सरकारने 2025 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ या तिसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवलं.
अभिनयासोबतच अनंत नाग यांनी कर्नाटकच्या राजकारणातही सहभाग घेतला. त्यांनी जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या कारकिर्दीत फिल्मफेअरचे 6 पुरस्कार आणि कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कारांमधील 5 सन्मानांचा समावेश आहे. रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या अनंत नाग यांच्या बहुआयामी प्रवासाचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव झाला आहे.