John Abraham Birthday : जॉनचं खरं नाव काय? शाळेतही स्टार किड्स पक्के दोस्त; जाणून घ्या, खास किस्से
John Abraham Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अन् डॅशिंग अभिनेता जॉन अब्राहम याचा आज (John Abraham Birthday) वाढदिवस. ज्या काळात हिरोच्या चेहऱ्याला जास्त किंमत दिली जायची त्या काळात दमदार शरीरीयष्टीच्या बळावर रुपेरी पडदा गाजवणारे जे कलाकार होते त्यात जॉनचं नाव घ्यावच लागेल. जॉनने मोठा पडदा तर गाजवलाच शिवाय त्याचं दुचाकींवरचं प्रेम जगजाहीर आहे. जॉनने एक मॉडेलच्या रुपात करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्याने अभिनयाच्या विश्वात पाऊल ठेवले. त्यानंतर या क्षेत्रातही त्याने यश मिळवलं. फक्त अभिनयच नाही तर जॉनचं दुचाकी प्रेमही जगजाहीर आहे. आज त्याच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला असेच काही किस्से सांगणार आहोत ज्यांची माहिती कदाचित तु्म्हाला नसेल.
जॉनचं खरं नाव काय?
आज जॉनचा वाढदिवस आहे. आज तो बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांत गणला जातो. त्याचा जन्म 17 डिसेंबर 1972 रोजी मुंबईत झाला. आज जॉन 51 वर्षांचा झाला आहे. त्याने अनेक हिट सिनेमांत काम केलं आहे. पण, खूप कमी लोकांना माहिती आहे की जॉनचं पारसी भाषेतील नाव फरहान असं आहे. मात्र, जसं त्याला समजायला लागलं तसं त्यानं जॉन हेच नाव कायम ठेवलं.
Animal मध्ये सलोनीनेही घातली भूरळ; सेलिब्रेटी रॅंकिंगमध्ये मिळालं वरचं स्थान
ऋतिक, उदय अन् अभिषेक शाळेतले दोस्त
सिनेमात येण्याआधी जॉनला त्याचे वडिल आणि भावाप्रमाणेच आर्किटेक्ट व्हायचं होतं. पण त्याच्या नशीबात वेगळंच काहीतरी लिहिलेलं होतं. सिनेमात येण्याआधी जॉनने मीडिया प्लॅनर आणि प्रमोशन मॅनेजर या पदावर अनेक मीडिया कंपन्यातही काम केलं. त्याने अर्थशास्त्र या विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये त्याने सुरुवातीचे शिक्षण घेतलं. याच शाळेत ऋतिक रोशन, उदय चोपडा आणि अभिषेक बच्चनसारखे सेलेब्स त्यावेळी शिकत होते. या सेलेब्सबरोबर जॉनचीही चांगली मैत्री झाली. ही गोष्टही अनेक लोकांना माहिती नसेल.
लहानपणीच तयार केला मोबाइल गेम
जॉनची लहानपणीचं आयुष्य फार वेगळं नव्हतं. त्याच्याही चेहऱ्यावर फोड होते. पण जसा तो मोठा झाला तसे त्याच्या चेहऱ्यावरील डागही गायब झाले. आता त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तर कुणालाही वाटणार नाही की त्याचा चेहरा लहानपणी मुरुमांनी भरलेला होता. त्याला लहानपण तंत्रज्ञानाची खूप आवड होती. याच छंदापायी त्याने वेलोसिटी नावाचा एक मोबाइल गेमही विकसित केला होता.