गांधी टॉक्स : शब्दांच्या पलीकडले…

Gandhi Talks Movie Review: जगण्यातलं कारण्य अन् प्रासंगिक विनोद याचा अनोखा मिलाफ असलेला हा सिनेमा आहे.

  • Written By: Published:
Gandhi Talks film review

Gandhi Talks Movie Review: ‘गांधी टॉक्स’ | शब्दांच्या पलीकडले… | भोवतालाच्या कोलाहलातून निर्माण होणाऱ्या असंख्य आवाजापलीकडचा एक सृजनशील हुंकाराचा उद्गार म्हणजे गांधी टॉक्स…haves & have not या दोन वर्गांच्या मधल्या दरीला सांधताना त्यामधील विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणारा… जगण्यातलं कारुण्य अन् प्रासंगिक विनोद याचा अनोखा मिलाफ असलेला हा सिनेमा आहे.

सिनेमा मुळात शांततेत जन्माला आला. भव्य पार्श्वसंगीत, गडगडाटी संवाद यांचा उदय होण्याच्या खूप आधी कथा चेहऱ्यांतून, फ्रेममधून आणि भावनांमधून सांगितल्या जात होत्या. सत्यजित रे यांची सिनेमॅटिक प्रतिभा, चार्ली चॅप्लिन आणि बस्टर कीटन यांची खोडकर शैली, ते कमल हासनच्या पुष्पक विमानमधील काव्यात्मक मूक अभिनयापर्यंत…मूक सिनेमाने नेहमीच प्रेक्षकांवर विश्वास ठेवला की ते ‘ऐकण्यापेक्षा’ अधिक ‘अनुभवतील’. किशोर पांडुरंग बेळेकर यांचा गांधी टॉक्स हीच परंपरा आत्मविश्वासाने पुढे नेतो आणि पुन्हा एकदा सिद्ध करतो की जेव्हा अभिनय प्रामाणिक असतो, पटकथा बांधेसूद असते आणि संगीताला नेमकं कुठे थांबायचं हे कळतं, तेव्हा शब्दांची गरजच उरत नाही… अगदी अकॅडमी अवॉर्ड विनर द आर्टिस्ट आणि कार्तिक सुब्बारावचा मर्क्युरी यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही…

गांधी टॉक्स हा विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी यांच्या प्रमुख भूमिका असलेला मूकपट आहे, जो मानवी मूल्यांवर पैशाचा होणारा प्रभाव अत्यंत प्रभावीपणे उलगडतो. या चित्रपटाची अनोखी मूक मांडणी प्रेक्षकांना गोंधळाच्या आणि अस्थिरतेच्या काळात नैतिकतेबद्दल आत्मपरीक्षण करायला भाग पाडते.

गांधी टॉक्स हे शीर्षकच अनेक अर्थांनी परिपूर्ण आहे. “पैसा बोलतो” ही म्हण आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. इथे गांधी अक्षरशः ‘बोलतो’. मूल्यांद्वारेच नव्हे, तर चलनाद्वारे. पात्रे रुपयांत नाही, तर ‘गांधी’मध्ये व्यवहार करतात. महात्मा गांधींचा चेहरा, जो कधी मूल्यांचा प्रतीक होता, आज सत्तेचं, प्रतिष्ठेचं आणि जगण्यासाठी लागणाऱ्या साधनांचं प्रतीक बनला आहे…हीच या चित्रपटाची बोचरी टिप्पणी. पण जसजसा चित्रपट पुढे जातो, तसतसे खरे गांधीवादी तत्वज्ञान शांतपणे उलगडतं. समाज बदलायचा असेल, तर तो बदल स्वतःपासून सुरू झाला पाहिजे. श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि मूल्यं महत्त्वाची आहेत आणि चित्रपट शेवटी याच निष्कर्षावर येतो.

कथेत पैसा हा अदृश्य नायक आहे. तो प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीने घडवतो. अरविंद स्वामींचा बोसमन हा अतिशय श्रीमंत आहे…प्रेमळ कुटुंब, मोठं घर, यशस्वी करिअर. पण एका क्षणात सगळं कोसळतं. अपघातात पत्नी आणि मुलगी जातात, नंतर आईचंही निधन होतं. कायदेशीर प्रकरणं वाढतात, करिअर ढासळतं, घर आणि संपत्ती नाहीशी होते. सगळं गमावलेला हा माणूस पाहणं, हे अस्वस्थ करणारं आणि वेदनादायक आहे.

दुसऱ्या टोकाला आहे विजय सेतुपतीचा महादेव … ज्याच्याकडे गमवायला पण काहीच नाही प्रेयसी अन् प्रेम सोडले तर…‘गरिबी’ हा शब्दही त्याच्या परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी अपुरा आहे. आजारी आईला खाऊ घालता येत नाही, शेजाऱ्यांकडून वीज चोरतो, आणि ज्या स्त्रीवर प्रेम करतो तिला चहाही घेऊन देऊ शकत नाही. अदिती त्याच्याशी लग्न करू इच्छितं, पण प्रेमाने पोट भरू शकत नाही… तिथे तिला तो हात कसा देणार आणि हा तरी कसा मागणार…नोकरी शोधताना त्याला सर्वत्र भ्रष्टाचार दिसतो. तेव्हाच त्याला उमगतं…गांधी बोलतो, पैसा बोलतो आणि त्या आवाजात नैतिकता ऐरणीवर येते आणि मूल्यांचा आवाज दाबला जातो.

चाळीतली घरं. त्यात एक मोडकळीला आलेली खोली. रंग उडून पोपडे पडलेल्या भिंती…. अठरा विश्व दारिद्र्य असलेले घर, ज्यात आजारी असलेली सतरंजीवर सतत पडून खोकत असलेली आई. थकलेली विजेची बिलं… तोडलेले कनेक्शन, उधारी असल्यानं अन्न कमी कमी होत गेलेला रोजच्या जेवणाचा डबा आणि त्यातल्या उधारी चुकवण्याबद्दलच्या चिठ्ठ्या. आणि हे सगळं निमूट सोसत असणारा बीए पास असलेला, नोकरीच्या शोधात असलेला व्याकुळ नजरेचा महादेव…

चित्रपटात भ्रष्टाचार आणि परिस्थिती यामुळे सगळं सहन करावं लागत असणारे मोहन आणि महादेव काहीवेळा योगायोगानं एकमेकांसमोर येतात. मोहन हा सहृदय श्रीमंत आहे, असं महादेवला वाटतं. तसंच तुमच्याकडे पैसा नसेल तर समोर रहाणा-या प्रिय व्यक्तीच्या प्रेमाला तुम्ही लायक नसता; समोरच्या अधिका-याला लाच दिल्याशिवाय नोकरीला लायक नसता, अशा सततच्या अनुभवांमुळे ख-याची दुनिया उरली नाही.. असं मोहनला वाटतं…

आणि तो अधिकच confused होऊन जातो…

मध्यंतरापर्यंतचा सिनेमा आणि मध्यंतरानंतरचा सिनेमा, असे दोन भाग ठाशीव पद्धतीने आपल्याला दिसत राहतात… मध्यंतरानंतर चित्रपटात “सिटी लाईटस”मध्ये फक्त दारु पिऊन चार्ली चॅप्लीनला ओळखणा-या धनाढ्य माणसाच्या घरात घडणा-या दृश्यांची आठवण होते..

पार्श्वसंगीत उत्कृष्ट आहे…कुठे वर यायचं आणि कुठे शांत व्हायचं… हे या मायस्ट्रोला नेमकेपणाने कळतं. ए आर रहमान यांच्या पार्श्व संगीताने सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेला आहे. सीनला खुलवण्यातली ताकद ही त्या सुरांमध्ये आहे याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो. त्यामुळे किशोरच्या लेखन आणि दिग्दर्शनाला पोषक असणारा संगीताचा साज ए आर रहमान च्या जादुई सुरांमध्ये आहे.

जुनी गाणी आणि नवीन संगीत यांचा संगम कथेला अधिक भावनिक खोली देतो. विजय सेतुपती प्रत्येक भावना अत्यंत प्रामाणिकपणे व्यक्त करतो आणि एका नृत्यप्रसंगात तो सुखद धक्का देतो. अरविंद स्वामी नेहमीप्रमाणे प्रभावी असून, आपण त्यांना मोठ्या पडद्यावर फार कमी का पाहतो, याची हुरहूर लागते. अदिती राव हैदरी तेजस्वी आहे—तिचे डोळेच सगळं सांगतात. महेश मांजरेकर आणि उषा नाडकर्णी आपल्या अनुभवाने कथेला बळ देतात, तर सिद्धार्थ जाधव आपल्या कॉमिक टायमिंगने हसू आणतो. विजय सेतु पती समोर तो तितकाच ठामपणे उभा राहतो आणि स्वतःच अस्तित्व गुणांच्या जोरावर सिद्ध करतो, विजय सेतुपती आणि सिद्धार्थ जाधवचे मोजकेच सीन्स आहेत, पण ते दोघेही किती ताकदीचे अभिनेते आहेत हे आपल्याला जुगलबंदी पाहिल्यावरच लक्षात येतं. 

गांधी टॉक्स”मध्ये “ऐ दिल है मुश्किल जीना यहॉं” सारखी रेडिओवर लागलेली गाणी किंवा जगजीतच्या गझलांच्या ओळीही मनाला भिडतात. ओरिजिनल बंगाली चित्रपट “दीप ज्वेले जाई”मधलं “यह रात तोमार आमार” हे गाणं इथे वापरणं फार खुबीने वापरले आहे. इथे दिग्दर्शकाच्या रसिकतेचा आणि त्याला अपेक्षित असलेल्या बिटवीन द लाईन्स… तो सहजपणे सांगून जातो…

यातल्या महादेवला पैसे चैन करायला नको आहेत. त्याला अन्न, वस्त्र, निवारा या बेसिक गरजा भागवायला पैसे हवे आहेत… या सिनेमात विसंगती टिपताना जगण्यातलं द्वंद्व दाखवताना पैसा किती महत्त्वाचा आहे हे दिसत राहतं … घरी येणारा जेवणाचा डबा रिकामा येतो आणि त्यामधून निघालेली चिठ्ठी …यापुढे उधारी दिल्याशिवायही डबा येणार नाही, हे कटू वास्तव सांगतं, त्यावेळी आईच्या कुशीत डोळे उघडे ठेवून अस्वस्थ झोपणारा महादेव ते अमानुष श्रीमंत घरातल्या फ्रिजमध्ये दिसणारे असंख्य अन्नपदार्थ पहातो आणि त्याला भुकेली आई, चाळीतली खोली आठवते… महादेवला एका पार्टीत बासरी ओठांवर धरलेल्या श्रीकृष्णाची मूर्ती बनून उभं रहायचं काम मिळतं. त्याला बघणा-या मुलांपैकी एक जण त्याच्या चेह-यावर आईसक्रीम फेकतो. डोळ्यांत तरळणारं पाणी कसंबसं लपवत तो तसाच उभा रहातो. मग मोहन येऊन त्याचा चेहरा रुमालानं पुसतो. तुम्ही गरीब असलात तर तुमचा अपमान करायचा अलिखित अधिकार कोणालाही देतं त्यावेळी तुमच्या भावना या इतरांसाठी दुय्यम असतात हे सांगणारा “बायसिकल थीफ”सारखा चित्रपट इथे सहज आठवतो… 

चित्रपटात अनेक सुंदर क्षण आहेत. एक दृश्य—विजय सेतुपती आणि अदिती राव हैदरी आपल्या-आपल्या बाल्कनीतून प्रेम व्यक्त करतात आणि दूरूनच कपाळावर किस करतात—अतिशय हळवं आणि मनाला भिडणारं आहे. अरविंदच्या घरातील चोरीचा प्रसंगही लक्षात राहतो—जिथे नवखा महादेव निरुपयोगी वस्तूंमध्ये अडकतो, तर अनुभवी चोर खऱ्या मौल्यवान वस्तू घेऊन निघून जातो. अनुभव, लोभ आणि भ्रम यावरची ही सूक्ष्म टिप्पणी आहे.

रील्स, सततचा गोंगाट आणि लक्ष विचलित करणाऱ्या जगात गांधी टॉक्स हा चित्रपट धाडसी वाटतो. तो कानांना दिलासा, मनाला शांतता आणि हृदयाला भिडण्याचे काम करतो. असा चित्रपट कल्पनेतून  प्रत्यक्षात आणणाऱ्या लेखक – दिग्दर्शक किशोर पांडुरंग बेळेकर या दिग्दर्शकाचा मनापासून कौतुक करायला हवं…

असे चित्रपट बनायलाच हवेत, जपले गेले पाहिजेत. ते नव्या लेखकांना आणि दिग्दर्शकांना आशा देतात की,  मूल्यांची बूज राखणाऱ्या उत्तम गोष्टींना आजही स्थान आहे, यासाठी पुन्हा एकदा किशोर बेळेकर आणि त्याच्या निर्मात्यांचे मनापासून कौतुक करायला पाहिजे. मुख्य प्रवाहातील कलावंतांना घेऊन मूकपटाचा प्रयोग करण्याची ताकद असणाऱ्या किशोर बेळेकर याला स्पेशल ब्राऊनी पॉईंट्स द्यायलाच हवे.

मुठीतून वाळू निसटावी अशा पद्धतीने सिनेमा प्रवाही होत राहतो गवसलाय असं वाटत असतानाच हातातून निसटून जावं अशा पद्धतीची बोच आपल्याला हा सिनेमा लावून जातो. या दोन जगांचा संगम झाल्यावर चित्रपट दाखवतो की कितीही वेगळ्या परिस्थिती असल्या, तरी सगळ्यांवर राज्य करणारी गोष्ट एकच आहे—पैसा. आणि इथेच चित्रपटाचं मोठं सत्य उघड होतं: उत्तम हेतू असलेले लोकसुद्धा कधीकधी परिस्थितीच्या ओझ्याखाली डगमगतात. पैसा समोर आला की नैतिकता लगेच नाहीशी होत नाही, पण ती नक्कीच पणाला लागते. त्या नैतिकतेच्या लिटमस टेस्टची ही अनोखी कहाणी आहे. या सिनेमाला मी देतोय चार स्टार्स. 

का पाहावा – दमदार अभिनय, उत्तम लेखन – दिग्दर्शन आणि श्रवणीय पार्श्वसंगीत – संगीत, रंगलेला ‘प्रयोग’
का टाळावा – गवसताना निसटतोय असे फिलिंग येते म्हणून
थोडक्यात काय – वास्तवाला भिडणाऱ्या जगण्याचा एक्स रे …

⭐⭐⭐⭐

अमित भंडारी, चित्रपट समीक्षक

follow us