मकरंद अनासपुरेंनी सांगितल्या नाना पाटेकरांच्या आठवणी; पत्नीच्या आजारात गुरुजींनी कशी साथ दिली?
Nana Patekar Memories : नाना पाटेकर यांना गुरुजी मानणाऱ्या मकरंद अनासपुरे यांनी एका लेखातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे (Nana) यांच्यातील मैत्रीचं नातं केवळ चित्रपटांपुरतं मर्यादित नव्हतं, तर त्यात जिव्हाळा आणि विश्वासही होता. नाना पाटेकर यांना आपण गुरुजी मानत असल्याचं मकरंद अनासपुरे यांनी एका मराठी वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात सांगितलं आहे. गुरुजींकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, असं सांगताना त्यांनी नानांच्या स्वभावाचंही वर्णन केलं. काही लोकांना नानांचा स्वभाव आंबट, तिखट किंवा कडवट वाटत असेल, तर काहींना तो गोड वाटत असेल. मात्र, आपण कायम त्यांच्या स्वभावातील गोडवा अनुभवला, असं मकरंद यांनी नमूद केलं.
मकरंद अनासपुरे यांच्या पत्नी शिल्पा यांना काही वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. या कठीण काळात मकरंद प्रचंड तणावात होते. पत्नीने आपल्या आजाराची माहिती इतरांना सांगू नये, अशी ताकीद त्यांना दिली होती. मात्र, नानांपासून कोणतीही गोष्ट लपवत नसल्याने मकरंद यांनी त्यांना याबाबत सांगितलं. त्यानंतर नाना पाटेकर यांनी तातडीनं डॉक्टर राजेंद्र बडवे यांच्याशी संपर्क साधला. शिल्पाच्या केमोथेरपीपासून शस्त्रक्रियेपर्यंतच्या उपचारांदरम्यान नानांनी मकरंद यांना सातत्यानं आधार दिला. त्यांचं मन दुसरीकडे गुंतवून ठेवण्यासाठी ते वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचे, अनुभव सांगायचे आणि विनोदी किस्सेही ऐकवायचे. आज शिल्पा पूर्णपणे बरी झाली असून, तिच्या उपचारात डॉक्टरांबरोबरच नानांचाही मोठा वाटा असल्याचं मकरंद यांनी पत्नीच्या परवानगीनं जाहीरपणे सांगितलं.
नाना पाटेकर यांना कोणत्याही कामात स्वतःचं स्टारडम न आणता मदत करणं आवडायचं, असंही मकरंद यांनी लेखात नमूद केलं आहे. ठाण्यातील आर्ट गॅलरीच्या एका कार्यक्रमासाठी गुलजार यांची ‘किताबे’ ही कविता नानांच्या आवाजात रेकॉर्ड करायची होती. यासाठी गुलजार यांनी मकरंद यांच्याकडे विचारणा केली होती. मकरंद यांनी नानांना फोन करताच त्यांनी आनंदानं होकार दिला आणि कार्यक्रमासाठी वेळ काढून कविता रेकॉर्ड करून दिली. प्रसिद्धी किंवा मोठेपणाचा विचार न करता दुसऱ्यांच्या कामासाठी पुढाकार घेण्याची नानांची ही वृत्ती अनेकांनी अनुभवली असल्याचं मकरंद यांनी सांगितलं.
‘यशवंत’ चित्रपटाच्या जुहू चौपाटीवरील चित्रीकरणादरम्यान घडलेला एक प्रसंगही मकरंद यांनी सांगितला. चित्रपटात ढोलक वाजवून पैसे कमावणाऱ्या एका रस्त्यावरील मुलाला भूमिका देण्यात आली होती. चित्रीकरणाच्या मधल्या वेळेत नाना त्या मुलाला ढोलक वेगवेगळ्या पद्धतीनं कसा वाजवायचा आणि त्यातून अधिक पैसे कसे मिळवता येतील, हे शिकवत होते. चित्रीकरण संपल्यानंतर त्यांनी निर्मिती पथकाला त्या मुलाला 1,000 रुपये देण्यास सांगितले आणि स्वतःही त्याला पैसे दिले. गरजू व्यक्तीला मदत करताना कोणताही गाजावाजा न करणाऱ्या नानांचा हा दिलदारपणा अनेकांच्या अनुभवाचा भाग असल्याचं मकरंद यांनी आपल्या लेखातून अधोरेखित केलं आहे.