‘सालबर्डी’ चित्रपटात सोनालीचा दिलखेचक अंदाज ; ‘अप्सरा’ बनली ‘मंजुळा’
Salbardi - ‘मंजुळा’या आयटम साँगची कोरिओग्राफी तितकीच आकर्षक आहे. याची कोरिओग्राफी फुलवा खामकर यांनी केली आहे.
Salbardi film: आपल्या दिलखेचक अदांनी भुरळ घालणारी ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni) नव्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. येत्या 17 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सालबर्डी’ (Salbardi) या चित्रपटातील ‘मंजुळा’ या धमाकेदार गाण्यातून सोनालीचा मनमोहक आणि हटके अंदाज पहायला मिळणार आहे. ‘मंजुळा’या आयटम साँगची कोरिओग्राफी तितकीच आकर्षक आहे. याची कोरिओग्राफी फुलवा खामकर यांनी केली आहे. गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं, संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत असलेलं, हे गाणं आनंदी जोशी हिने गायलं आहे.
‘सालबर्डी’ या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केलीय. आजवर गुल्हर, बाबो, पाणीपुरी यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी ‘सालबर्डी’ हा मल्टीस्टारर रहस्यमय थरारपट रसिकांसाठी आणला आहे.
‘मंजुळा’ या नव्या गाण्याबद्दल बोलताना सोनाली म्हणते, ‘हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. या गाण्यात एक वेगळीच एनर्जी आहे. फुलवाने सुद्धा या गाण्यातून काहीतरी नवीन आणि एंटरटेनिंग देण्याचा प्रयत्न केलाय. ते प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल. सोनालीच्या या नव्या गाण्यामुळे ‘सालबर्डी’ चित्रपटाबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली आहे.
महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ या गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा ‘सालबर्डी’ चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. आकर्षक कोरिओग्राफी, भन्नाट स्टेप्स आणि झिंग आणणारी सोनालीची एनर्जी यामुळे ही ‘मंजुळा’ प्रेक्षकांसाठी व्हिज्युअल ट्रीट ठरणार आहे.