‘तुला पाहता’ Movie Review: दोन पिढ्यांची भावस्पर्शी कहाणी; प्रेम, लग्न आणि बरंच काही…

Tula Pahata लग्न, कमिटमेंट, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि कुटुंबव्यवस्था यांच्यामध्ये आजची पिढी प्रेमाकडे नेमकं कसं पाहते?

Tula Pahata

‘Tula Pahata’ Movie Review touching story spanning two generations love, marriage, much more : प्रेमाची व्याख्या काळानुसार बदलते का? लग्न, कमिटमेंट, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि कुटुंबव्यवस्था यांच्यामध्ये आजची पिढी प्रेमाकडे नेमकं कसं पाहते? या प्रश्नांना भिडण्याचा संवेदनशील प्रयत्न दिग्दर्शिका मयुरा प्रधान यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून ‘तुला पाहता’मध्ये केला आहे. दोन वेगवेगळ्या काळातील दोन प्रेमकथा एकत्र गुंफत हा चित्रपट प्रेमाचा, विरहाचा आणि पुन्हा एकदा नात्यांना सामोरं जाण्याचा हळवा प्रवास घडवत

दोन प्रेमकथा… पण भावना एकच!

चित्रपटाची कथा १९७१ आणि २०२६ या दोन कालखंडांमध्ये घडते. त्यामुळे हा केवळ दोन प्रेमकथांचा प्रवास राहत नाही, तर बदलत्या समाजाचा, बदलत्या मूल्यांचा आणि बदलत्या नातेसंबंधांचा आरसाही ठरतो. तरुणपणी अरुंधतीच्या (इला भाटे) प्रेमात आकंठ बुडालेला हरी (सतीश पुळेकर) अचानक तिच्या आयुष्यातून निघून जातो. अनेक वर्षांनी निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून तो पुन्हा तिच्यासमोर उभा राहतो. मात्र तोपर्यंत अरुंधतीच्या आयुष्यात खूप काही बदललेलं असतं. जुन्या जखमा पुन्हा उघडतात, आठवणी जाग्या होतात आणि अनेक अनुत्तरित प्रश्न समोर येतात. दुसरीकडे आजच्या पिढीतील तन्वी (मानसी पाटील) आणि आदित्य (नचिकेत लेले) यांच्या नात्यातून प्रेम, करिअर, स्वातंत्र्य, कमिटमेंट आणि लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या विषयांवर चित्रपट भाष्य करतो. संगीत आणि बुद्धिबळाच्या खेळाशी या दोन कथा जोडण्याचा दिग्दर्शिकेचा प्रयत्न वेगळा आणि लक्षवेधी ठरतो.

सतीश पुळेकर आणि इला भाटे… चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट!

चित्रपट संपल्यानंतर सर्वाधिक लक्षात राहतात ते सतीश पुळेकर आणि इला भाटे.सतीश पुळेकर यांनी साकारलेला हरी अत्यंत संयमी, मितभाषी आणि भावनांनी समृद्ध आहे. कोणताही मोठा आव न आणता त्यांनी पात्रातील वेदना, अपराधीपणा आणि प्रेम सहज व्यक्त केलं आहे. इला भाटे यांनी साकारलेली अरुंधती ही चित्रपटाचा आत्माच म्हणावी लागेल. त्यांच्या डोळ्यांतील भावना, संवादांतील संयम आणि प्रसंगांतील सहजता प्रेक्षकांना पात्राशी जोडून ठेवते. या दोघांची केमिस्ट्रीच चित्रपटाला वेगळी उंची देते.

नवी जोडी प्रामाणिक, पण अनुभवाची उणीव जाणवते…

नचिकेत लेले आणि मानसी पाटील यांची जोडी ताजी वाटते. दोघेही त्यांच्या भूमिकांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र अनुभवी कलाकारांसोबतच्या दृश्यांमध्ये त्यांचा नवखेपणा प्रकर्षाने जाणवतो. विशेषतः नचिकेत लेले याच्यात अभिनयाची क्षमता दिसते, पण त्याचा अभिनय गाण्यासारखा परिपक्व होण्याची गरज आहे. ते झालं तर नवा आश्वासक चेहरा मिळेल. मानसी पाटील ही आपल्या सहज अभिनयाने लक्ष वेधून घेते.

सहकलाकारांचीही प्रभावी साथ

आनंद काळे यांनी साकारलेली वडिलांची भूमिका चित्रपटाला भावनिक आधार देते. निशिगंधा वाड यांची आई, दीपाली विचारे यांचा प्रभावी अभिनय, पल्लवी अजय यांची तरुण अरुंधती तसेच स्वप्नील परजाणे आणि आकाश शिंदे यांनीही त्यांच्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत.

दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू मजबूत

लेखिका-दिग्दर्शिका मयुरा प्रधान यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी त्यांनी नातेसंबंधांवर अत्यंत संवेदनशील भाष्य केलं आहे. प्रत्येक फ्रेम सुंदर दिसावी यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत स्पष्ट जाणवते. पुष्कर झोटिंग यांची सिनेमॅटोग्राफी चित्रपटाचं सौंदर्य वाढवते, तर अपूर्वा मोतीवाले सहाय यांचं संकलन कथेला आवश्यक गती देतं. रोहन-रोहन यांचं संगीत हा चित्रपटाचा आणखी एक मजबूत पैलू आहे. विशेषतः टायटल ट्रॅक दीर्घकाळ लक्षात राहतो. रोहित प्रधान यांचं ध्वनिआरेखन आणि दीपाली विचारे यांचं नृत्यदिग्दर्शनही प्रभावी ठरतं.

कुठे कमी पडतो चित्रपट?

चित्रपटाचा पूर्वार्ध संथ गतीने पुढे सरकतो. उत्तरार्धात अनेक रहस्यांचा उलगडा होतो आणि कथा रंगते. मात्र काही ट्विस्ट आणि कथानकातील वळणांचा अंदाज आधीच येत असल्याने अपेक्षित धक्का बसत नाही. काही प्रसंग अधिक घट्ट आणि बांधेसूद लिहिले असते, तर चित्रपटाचा प्रभाव आणखी वाढला असता. तर, तुला पाहता’ हा मोठे ट्विस्ट देणारा किंवा भव्य मांडणीचा चित्रपट नाही. पण तो शांतपणे मनात उतरणारा सिनेमा आहे. बदलत्या काळात प्रेमाचा अर्थ कसा बदलतो, नाती कशी टिकतात आणि काही भावना वर्षानुवर्षे तशाच राहतात, याची हळवी आठवण हा चित्रपट करून देतो. काही प्रेडिक्टेबल क्षण असूनही सतीश पुळेकर आणि इला भाटे यांच्या अभिनयासाठी हा चित्रपट नक्की पाहण्यासारखा आहे.

का पाहावा?
दोन पिढ्यांतील प्रेमाचा भावनिक प्रवास
सतीश पुळेकर आणि इला भाटे यांचा भावणारा अभिनय
प्रेम, लग्न, कमिटमेंट आणि नातेसंबंधांवर संवेदनशील भाष्य

का टाळावा?
काही प्रसंग आणि ट्विस्ट सहज ओळखू येतात
पूर्वार्ध काहीसा संथ वाटतो

थोडक्यात काय?
दोन पिढ्यांच्या नात्यांमधील काळानुसार बदललेली प्रेमाची व्याख्या, कमिटमेंट चा अर्थ यावर भाष्य करणारा संवेदनशील प्रयत्न.

फिल्म – तुला पाहता…

निर्मिती -ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्स, मयुरा प्रधान
दिग्दर्शिका – मयुरा प्रधान
कथा, पटकथा, संवाद – मयुरा प्रधान
कॅमेरामन – पुष्कर झोटिंग
संकलन – अपूर्वा मोतीवाले
संगीत – रोहन- रोहन

कलाकार…

सतीश पुळेकर, इला भाटे, मानसी पाटील, नचिकेत लेले, निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी पाटील, स्वप्नील परजणे, आकाश शिंदे.

⭐⭐⭐ 3/5

follow us