‘वेल डन आई’ चित्रपटाचा धम्माल टीझर प्रदर्शित! 31 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट होणार प्रदर्शित
आधुनिक युगातील आईची धमाल गोष्ट 'वेल डन आई' या चित्रपटात पाहायला मिळणार . 31 ऑक्टोबरला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Well Done Aai Movie Teaser Out : आजच्या माॅडर्न युगातील आईची गोष्ट सांगणारा ‘वेल डन आई’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. आई ही आई असते, मग ती पूर्वीच्या काळातील असो वा, आजच्या काळातील… आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते, कोणतीही गोष्ट सहन करू शकते. मुलाला ठेच जरी लागली, तरी आईच्या डोळ्यांतून पाणी येते. अशाच आधुनिक युगातील आईची धमाल गोष्ट ‘वेल डन आई’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 31 ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धडाकेबाज टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
प्रेक्षकांचे लक्ष वेधले
निर्माते सुधीर पाटील यांनी ( Well Done Aai) दीपाली प्रोडक्शन या बॅनरअंतर्गत ‘वेल डन आई’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शंकर अर्चना बापू धुलगुडे यांनी केले आहे. कथा, पटकथा आणि संवादलेखन संदीप गचांडे व (Marathi Movie) शंकर धुलगुडे यांनी केले आहे. ‘वेल डन आई’च्या टीझरने प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटातील आईचा काहीतरी प्लॅन असल्याचे टीझरमध्ये पाहायला मिळते. टिझरच्या सुरुवातीलाच आई म्हणते की, ‘मी जो प्लॅन सांगितलेला आहे तसेच सर्वांनी करायचे. जे सांगितलेले नाही ते करायचे (Entertainment News) नाही.’ आईच्या म्हणण्यानुसार सर्वजण तयार होतात, पण आईचा नेमका प्लॅन काय आहे? हे मात्र टीझरमध्ये समजत नाही.
टीझर खऱ्या अर्थाने उत्साहवर्धक
या प्लॅनचा उलगडा प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच होईल. आईचा आत्मविश्वास बघून मुलाचाही आत्मविश्वास दुणावतो आणि तो म्हणतो की, यंदा माझं लग्न नक्की होणार… मुलाच्या वडीलांचं एक वेगळंच कॅरेक्टर आहे. ‘वेल डन आई’चा टीझर खऱ्या अर्थाने उत्साहवर्धक असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवणारा आहे. या चित्रपटात खूप धमाल आणि मस्तीही असणार याची जाणीवही टीझर पाहिल्यावर होते.
कलाकार महत्वपूर्ण भूमिकांमध्ये
महाराष्ट्राच्या घरोघरी लोकप्रिय असलेल्या कॅामेडी क्वीन विशाखा सुभेदारने ‘वेल डन आई’मध्ये शीर्षक भूमिका साकारली आहे. याखेरीज विजय निकम, जयवंत वाडकर, आयुष पाटील, सिमरन खेडकर, बीना सिद्धार्थ, तन्वी धुरी, विपुल खंडाळे आदी कलाकार महत्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. सिनेपोलीस या चित्रपटाचे वितरण करणार आहे. गीतकार संदीप गचांडे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केले असून, संगीतकार निशाद गोलांबरे यांनी संगीत दिले आहे. ऍग्नेल रोमन यांनी पार्श्वसंगीत, तर देवेंद्र तावडे यांनी कलादिग्दर्शन केले आहे. रंजीत साहू यांनी छायांकन केले असून निलेश गावंड यांनी संकलन केले आहे. नृत्य दिग्दर्शन चिनी चेतन यांनी केले असून, केशभूषा मयुरी बस्तावडेकर यांनी केली आहे. प्रतिभा गायकवाड यांनी वेशभूषा केली असून, माधव म्हापणकर यांची रंगभूषा आहे. मानस रेडकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक असून, राज्यपाल सिंह यांनी कार्यकारी निर्मात्याची भूमिका चोख बजावली आहे. काफिल अन्सारी यांनी प्रोडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे.