Year Ender 2023: सीमा देव ते रविंद्र बेर्डे; ‘या’ मराठी कलाकारांनी घेतला 2023 मध्ये जगाचा निरोप

Year Ender 2023: सीमा देव ते रविंद्र बेर्डे; ‘या’ मराठी कलाकारांनी घेतला 2023 मध्ये जगाचा निरोप

Year Ender 2023: 2023 या वर्षाचे अवघे काही दिवस बाकी आहेत. (Year Ender 2023) यावर्षी अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. कलाकारांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीला (entertainment) मोठा धक्का बसला. जाणून घेऊया अशा कलाकारांबद्दल ज्यांनी 2023 या वर्षी जगाचा निरोप घेतला.

सीमा देव: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव (Seema Dev) यांचं 24 ऑगस्ट दिवशी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांचा मुलगा अभिनय देव यांच्या घरीच सीमा देव यांचं निधन झालं. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. तसंच विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता.

सुलोचना लाटकर: मराठी चित्रपट विश्वात आपल्या अभिनयानं वेगळी छाप निर्माण करणाऱ्या सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे निधन 4 जून दिवशी झालं आहे. त्यांनी वयाच्या 94व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. दीदी या काही दिवसांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या.

मिलिंद सफई: मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद सफई (Milind Safai) यांचे 25 ऑगस्ट दिवशी निधन झाले आहे. अभिनेते मिलिंद सफई मागील काही काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये प्रेमळ बाबांची आणि सासऱ्यांची भूमिका साकारली होती. ते ‘आई कुठे काय करते’ या गाजत असलेल्या मालिकेत त्यांनी ‘अरुंधती’च्या बाबांची भूमिका केली होती.

रविंद्र महाजनी: आपल्या देखण्या आणि रुबाबदार रुपाने मराठी मनोरंजन सृष्टीवर अधिराज्य गाजवणारे अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे 15 जुलै दिवशी निधन झाले आहे. 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते पुण्यातील तळेगाव-दाभाडे परिसरात भाड्याने राहत होते.

Year Ender: 2023 ‘या’ वर्षात मराठी सेलिब्रिटींचा मोठ्या थाटात पार पडला लग्नसोहळा

नितीन चंद्रकांत देसाई: प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत कर्जतमधील त्यांच्या एन डी स्टुडिओमध्ये आढळला. ते 58 वर्षांचे होते. नितीन चंद्रकांत देसाई यांनी 2 ऑगस्ट गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली.

जयंत सावरकर: मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (Jayant Savarkar) यांचे 24 जुलै दिवशी निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते.

रवींद्र बेर्डे: मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या चरित्र कलाकारांमध्ये अग्रणी असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे (Ravindra Berde) यांचे 13 डिसेंबर दिवशी मध्यरात्री निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube