‘लेबनॉन सोडा…’, भारतीय दूतावासाचा नागरिकांना महत्वाचा सल्ला, हेल्पलाइन नंबर जारी
Israel-Hezbollah War: गेल्या आठवड्यापासून इस्रायल लेबनॉनवर (Lebanon) हवाई हल्ला करत आहे. या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 600 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. यातच इस्रायल (Israel) आता जमिनीवर युद्ध करण्याची तयारी करत असल्याची माहितीची समोर आली आहे. त्यामुळे लेबनॉनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर लेबनॉन सोडण्याचा सल्ला बेरूतमधील भारतीय दूतावासाने दिला आहे. तसेच नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी केले आहे.
तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत लेबनॉनमध्ये न जाण्याचे आवाहन देखील भारतीय नागरिकांना करण्यात आले आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लेबनॉनमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 620 जणांचा मुत्यू झाला आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत लेबनॉनला प्रवास न करण्याचा सल्ला भारतीय दूतावासाने दिला आहे.
हेल्पलाइन नंबर जारी
भारतीय दूतावासाने सांगितले की, लेबनॉनमध्ये उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना लेबनॉन सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे मात्र जे कोणत्याही कारणास्तव तेथे राहतील त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, त्यांच्या हालचाली मर्यादित कराव्यात आणि आमच्या ईमेल आयडी: cons.beirut@mea.gov.in किंवा फोन नंबर +96176860128 द्वारे बेरूतमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा.
गेल्या काही दिवसांपासून इस्रायलने हिजबुल्लालावर टार्गेट करत हवाई हल्ले करत आहे तर दुसरीकडे हिजबुल्लाहने देखील इस्रायलवर रॉकेट डागून प्रत्युत्तर दिले. इस्त्रायली संरक्षण दलाने सांगितले की हवाई दलाने दक्षिण लेबनॉन आणि बेका व्हॅलीमध्ये 1,600 हून अधिक टार्गेटवर हल्ला केला. यामध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपक, कमांड पोस्ट आणि नागरिकांच्या घरांमध्ये असलेल्या इतर दहशतवादी पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
आमदार प्राजक्त तनपुरे मैदानात! मतदारसंघात विकासकामांचा धडाका…
इस्रायली रणगाड्यांनी सीमेजवळील ऐता ॲश शाब आणि रामायह भागात इतर हिजबुल्लाच्या स्थानांवर हल्ला केला. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील शत्रुत्वात वाढ गेल्या आठवड्यात लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकींना लक्ष्य करणाऱ्या स्फोटांमुळे झाली आहे. अनेक लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले. या स्फोटांसाठी हिजबुल्लाहने इस्रायलला जबाबदार धरले. मात्र, इस्रायलने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.