Morocco Earthquake : मोरोक्कोत जीवघेणा भूकंप! 296 हून आधिक ठार, इमारती कोसळल्या

Morocco Earthquake : मोरोक्कोत शुक्रवारी रात्री शक्तीशाली भूकंप (Morocco Earthquake) झाला. या भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपात किमान 296 लोकांचा मृत्यू झाला तर 153 लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती मोरोक्कोच्या गृहमंत्रालयाने दिली. भूकंप इतका जबरदस्त होता की अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. या इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. देशात अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला. शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवू लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू मार्राकेशपासून 71 किलोमीटर दूर दक्षिण-पश्चिम भागात 18.5 किलोमीटर खोल होता.
या भूकंपात (Morocco Earthquake) 296 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. यातील काही गंभीर जखमीही आहेत. तर काही लोक अजूनही ढिगाऱ्यााखाली अडकले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. यातील एका व्हायरल झालेल्या व्हीडिओत इमारती कोसळताना दिसत आहेत. शॉपिंग सेंटर, हॉटेल्स, अपार्टमेंटमधून बाहेर पळतानाही दिसत आहेत.
Extremely pained by the loss of lives due to an earthquake in Morocco. In this tragic hour, my thoughts are with the people of Morocco. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover at the earliest. India is ready to offer all possible assistance to…
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2023
पीएम मोदींकडून संवेदना व्यक्त
या दुःखदायक घटनेवर पीएम मोदींनीही संवेदना व्यक्त केल्या आहेत. मोरोक्कोत भूकंपामुळे (Morocco Earthquake) झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले या दुःखद क्षणात माझ्या प्रार्थना मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. ज्या नागरिकांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. या कठीण काळात मोरोक्कोला शक्य ती मदत देण्यासाठी भारत तत्पर आहे, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
न्यूजीलँडमध्येही जमीन हादरली
मोरोक्कोतील भूकंपाव्यतिरिक्त न्यूजीलँडमधील कॅरमाडेक बेटांवरील दक्षिणी भागातही शुक्रवारी जोरदार भूकंप झाला. 6.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. जीएफजेड जर्मन रिसर्च सेंटर फॉर जियोसायन्सेसने ही माहिती दिली. जीएफजेडनुसार, आज सकाळी 9.9 वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत 80.3 किलोमीटर खोलीवर होता. त्यामुळे भूकंप जोरदार असला तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.