Pakistan : इस्त्रायल-हमास युद्धाचा इफेक्ट! पाकिस्तानात नववर्षाच्या जल्लोषावर बंदी

Pakistan : इस्त्रायल-हमास युद्धाचा इफेक्ट! पाकिस्तानात नववर्षाच्या जल्लोषावर बंदी

Pakistan News : भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानातून मोठी बातमी (Pakistan News) समोर आली आहे. अख्खं जग जिथं नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करत असताना पाकिस्तानात मात्र नवीन वर्षच साजरं केलं जाणार नाही. यावर्षी पाकिस्तानात (Pakistan) नववर्षाचा जल्लोष होणार नाही, अशी घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी देशाला संबोधित करताना ही माहिती दिली. इस्त्रायल आणि हमास यांच्यात (Israel Hamas War) अजूनही युद्ध सुरू आहे. या युद्धात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. या युद्धात पॅलेस्टिनी नागरिकांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आणि इस्त्रायलचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच हिंदू महिला, कोण आहेत सवीरा प्रकाश?

पॅलेस्टाईनमधील सध्याची गंभीर परिस्थिती पाहता आणि आपल्या पॅलेस्टिनी बांधवांबरोबर आपण आहोत हे दाखविण्यासाठी सरकार नववर्षाच्या कोणत्याही आयोजनावर बंदी आणेल, असे काकर म्हणाले. पॅलेस्टिनी नागरिकांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. त्यामुळे यंदा पाकिस्तानात कोणत्याही प्रकारचा जल्लोष होणार नाही. गाझात 21 हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून यात 9 हजार लहान मुलांचाही समावेश आहे. पॅलेस्टाईनला पाकिस्तानने दोन वेळेस मदत दिली आहे. आता तिसरी खेपही लवकरच पाठवण्यात येणार आहे. गाझात निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. आम्ही जागतिक पातळीवर त्यांच्यासाठी आवाज उठवत आहोत. आता वेळ आली आहे की जगाने एक होत इस्त्रायलच्या कारवाया रोखाव्यात, असेही काकर म्हणाले.

पाकिस्तान सरकार सध्या जॉर्डन, इजिप्त आणि तुर्की सरकारबरोबर चर्चा करत आहे. आम्ही गाझात जास्त मदत पाठविण्याचा प्रयत्न करत आहोत. या व्यतिरिक्त युद्धात जखमी झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांना गाझातून बाहेर काढण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत, असेही काकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Israel–Hamas War : इस्त्रायलकडून हल्ले सुरूच, गाझापट्टीत बॉम्बवर्षाव, 166 जणांचा मृत्यू

दरम्यान, 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. युद्धात मोठं नुकसान झालं आहे. हजारो लोकांचा बळी गेला आहे. या युद्धाचे चटके जगालाही बसू लागले होते. त्यामुळे अन्य देशांच्या मध्यस्थीनंतर 24 नोव्हेंबरपासून सात दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. बुधवारी युद्धबंदीच्या शेवटच्या दिवशी हमासने इस्त्रायलच्या 16 ओलिसांची सुटका केली होती. मात्र हमासने अद्याप सगळ्या बंधकांची सुटका केलेली नाही असा आरोप इस्त्रायलने केला होता. तसेच गाझा पट्टीत कुणीही निर्दोष नाही असे इस्त्रायलने ठासून सांगितले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube