देशवासियांना पॉर्न दाखवून युद्ध लढणार! रशियाविरोधात युद्धखर्चासाठी युक्रेनची नवी खेळी, जगात चर्चा
युद्धकाळात अशा क्रिएटर्सवर खटले चालवण्यासाठी सरकारी यंत्रणेची संसाधनं खर्च करणं योग्य नसल्याचं कर वकील लेसिया मिखालेंको यांनी म्हटलं आहे.
रशियाविरोधातील युद्ध सुरू असताना युक्रेन (Ukraine-Russia War) सरकारसमोर वाढता युद्धखर्च हे मोठं आव्हान ठरत आहे. अशातच देशातील एडल्ट कंटेंट इंडस्ट्रीला कायदेशीर मान्यता देऊन त्यातून कराच्या स्वरूपात महसूल मिळवण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. युक्रेनचे खासदार यारोस्लाव जेलेजनियाक यांच्या पुढाकाराने मांडण्यात आलेल्या या विधेयकाचा उद्देश पोर्नोग्राफिक कंटेंटच्या निर्मितीला कायदेशीर चौकटीत आणून त्यातून सरकारला कर मिळवून देणे हा आहे. जेलेजनियाक हे युक्रेनी संसदेच्या वित्त समितीचे अध्यक्ष आहेत.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, या उद्योगाला कायदेशीर मान्यता मिळाल्यास युक्रेन सरकारला दरवर्षी सुमारे $25 million इतका कर महसूल मिळू शकतो, असा अंदाज जेलेजनियाक यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, या रकमेतून युद्धासाठी सुमारे 30 हजार ड्रोन खरेदी करता येऊ शकतात. त्यामुळे युद्धाच्या काळात महसूल वाढवण्यासाठी हा पर्याय महत्त्वाचा ठरू शकतो, असा दावा या प्रस्तावामागे करण्यात आला आहे.
युक्रेनमध्ये सध्या पोर्नोग्राफीची निर्मिती, त्याचा साठा करणे किंवा त्याचा प्रसार करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. अशा प्रकरणात 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, कायदेशीर बंदी असतानाही देशातील एडल्ट कंटेंट इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. या उद्योगाला काही भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांकडून अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याचेही दावे करण्यात आले आहेत.
दरम्यान, युक्रेनच्या कर अधिकाऱ्यांनी एडल्ट कंटेंट तयार करणाऱ्या क्रिएटर्सकडून कर वसुलीची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे एक विचित्र कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. उत्पन्न जाहीर करणाऱ्या क्रिएटर्सवर कर न भरल्यास कारवाई होऊ शकते, तर उत्पन्नाचा स्रोत जाहीर केल्यानंतर पोर्नोग्राफीविरोधी कायद्यानुसारही कारवाईचा धोका आहे. जेलेजनियाक यांनी या परिस्थितीला ट्रेजिकॉमिक असल्याचं म्हटलं असून, महिलांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत असल्याचं सांगितलं आहे.
ओन्लीफॅन्सच्या पॅरंट कंपनी फेनिक्स इंटरनॅशनलच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये सुमारे 7,900 युक्रेनियन नागरिकांनी ओन्लीफॅन्सच्या माध्यमातून $131 million पेक्षा अधिक कमाई केली होती. कर विभागाच्या कारवाईनंतर काही क्रिएटर्सना करचोरी आणि बेकायदेशीर एडल्ट कंटेंट तयार केल्याच्या आरोपांवर नोटीस बजावण्यात आली आहे. क्रिएटर स्वितलाना ड्वोर्निकोवा यांनी पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकून $20,000 रोख रक्कम, लॅपटॉप आणि हार्ड ड्राइव्ह जप्त केल्याचा दावा केला आहे. प्रकरण मिटवण्यासाठी लाच मागण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
युद्धकाळात अशा क्रिएटर्सवर खटले चालवण्यासाठी सरकारी यंत्रणेची संसाधनं खर्च करणं योग्य नसल्याचं कर वकील लेसिया मिखालेंको यांनी म्हटलं आहे. ड्वोर्निकोवा यांनी राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या वेबसाईटवर याचिकाही दाखल केली असून, आपण प्रामाणिक करदाते असल्याचा दावा करत सुमारे $900,000 कर भरल्याचं म्हटलं आहे. या याचिकेला एका आठवड्यात 25 हजारांहून अधिक स्वाक्षऱ्या मिळाल्या. त्यानंतर झेलेन्स्की सरकार या प्रस्तावाकडे गांभीर्याने पाहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विधेयकाला जुलैमध्ये पहिल्या रिडिंगमध्ये मंजुरी मिळाली असून, आता दुसऱ्या रिडिंगची प्रतीक्षा आहे.