टॅटूमुळे साबडला धागा! मावसभावाचे पत्नीशी अफेअर; धुळ्यातल्या घटनेनं नात्याला काळीमा फासला
नऊ दिवस पाण्यात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता आणि ओळख पटवणे अत्यंत कठीण होते. मात्र, अंगावर असलेल्या टॅटूमुळे तपासाला दिशा मिळाली.
धुळे जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात उघडकीस आलेल्या एका हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. अवधान एमआयडीसी परिसरातील एका विहिरीत सापडलेल्या अज्ञात मृतदेहाने सुरुवातीला पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. तब्बल नऊ दिवस पाण्यात राहिल्यामुळे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता आणि त्याची ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले होते. मात्र, मृतदेहाच्या अंगावर असलेल्या टॅटूमुळे तपासाला निर्णायक दिशा मिळाली.
पोलिसांना मृतदेहाच्या छातीवर “RAVI” आणि हातावर “Radha” असे टॅटू आढळले. या महत्त्वाच्या धाग्याच्या आधारे तपासाची दिशा बदलली आणि मृत व्यक्तीची ओळख दिवाणमळा येथील रवी मालचे अशी पटली. ओळख निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या २४ तासांत संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, रवी मालचे याचे आरोपी बापू मालचे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधांमुळे निर्माण झालेल्या वैयक्तिक वादातूनच हा खून झाल्याचे स्पष्ट झाले. १८ मार्चच्या रात्री बापू मालचे याने आपल्या पत्नीच्या मदतीने रवीचा खून केला. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घेत मृतदेह विहिरीत टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि बारकाईने केलेल्या तपासामुळे हा प्रयत्न फसला. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. मोहाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने तपास करत अल्पावधीतच आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
पोलिसांनी बापू मालचे आणि त्याच्या पत्नीला अटक केली असून, दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, वैयक्तिक वादातून घडलेल्या या हत्येने पुन्हा एकदा समाजातील नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.