ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय आशिष बॅनर्जी यांची आत्महत्या; मृतदेहाजवळ सापडली धक्कादायक चिठ्ठी
आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह रविवारी सकाळी रामपूरहाट येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या पक्ष कार्यालयात आढळून आला.
Ashish Banerjee’s suicide : पश्चिम बंगालच्या राजकारणाला मोठा धक्का देणारी घटना समोर आली असून, तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपसभापती आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह रविवारी सकाळी रामपूरहाट येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या पक्ष कार्यालयात आढळून आला. 75 वर्षीय बॅनर्जी हे बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट मतदारसंघाचे सलग पाच वेळा आमदार राहिले होते आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जात होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
घटनास्थळी पोलिसांना एका पानाची चिठ्ठीही सापडली आहे. या चिठ्ठीत आशिष बॅनर्जी यांनी आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद केले आहे. मात्र, राजकारणात प्रवेश करणे ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मुळात शिक्षक असलेल्या बॅनर्जी यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत प्रामाणिकपणे काम केल्याचा उल्लेख चिठ्ठीत केला आहे. आयुष्यभर आपण चुकीच्या मार्गाने एक पैसाही कमावला नाही, विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण दिले आणि सार्वजनिक जीवनात स्वच्छ प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी लिहिले आहे.
तसेच काही व्यक्तींनी आपल्याला राजकीयदृष्ट्या बाजूला सारण्याचा आणि आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. आपण कोणत्याही भ्रष्टाचारात सहभागी नव्हतो, तरीही अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आपल्या मनातील वेदना आणि निराशा व्यक्त करताना कुटुंबातील पुढील पिढ्यांनी राजकारणात येऊ नये, असा सल्लाही त्यांनी चिठ्ठीत दिला आहे. या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत.
पान मसाला जाहिरातींवर FDA चा बडगा; अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस
आशिष बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसमधील अत्यंत अनुभवी आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. रामपूरहाट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2001, 2006, 2011, 2016 आणि 2021 अशा सलग पाच निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. ममता बॅनर्जी सरकारमध्ये त्यांनी शिक्षण आणि कृषी मंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच पश्चिम बंगाल विधानसभेचे उपसभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. ग्रामीण भागातील विकासकामे, शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि जनसंपर्क यामुळे त्यांचा मतदारसंघात मोठा प्रभाव होता.
मात्र, अलीकडील विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपचे उमेदवार ध्रुव साहा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असल्याची चर्चा होती. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली असून, अनेक राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून, पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.