मनीषा जेऊरकर मृत्यू प्रकरणात प्रेमाचा अनैतिक अँगल; निलेश यांच्यानंतर स्वाती चव्हाणलाही अटक

Manisha Jejurkar Death Case : मनीषा यांच्या कुटुंबीयांनी निलेश यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 21T165156.513

Dr. Manisha Jejurkar Death Case : नाशिकमधील डॉ. मनीषा जेजुरकर (Jejurkar) यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी डॉ. स्वाती चव्हाण यांना अटक केल्यानं तपासाला नवं वळण मिळालं आहे. 6 मार्च 2026 रोजी मनीषा यांचा राहत्या घरातील खिडकीला दोरीच्या साहाय्यानं गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. सुरुवातीपासूनच या घटनेमागं आत्महत्या की घातपात, याबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. आता मनीषा यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर यांच्यानंतर स्वाती चव्हाण यांच्या अटकेनं प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे.

निलेश जेजुरकर यांना अटक केल्यानंतर झालेल्या चौकशीत स्वाती चव्हाण यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मनीषा यांच्या कुटुंबीयांनी निलेश यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेपासून वाचण्यासाठी निलेश यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळत पोलिसांसमोर शरण जाण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता स्वाती चव्हाण यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; पती डॉ. नीलेश जेजुरकर अखेर अटकेत

स्वाती चव्हाण यांची यापूर्वी पोलिसांनी 9 वेळा चौकशी केली होती. त्यांचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे. मनीषा यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. मात्र, स्वाती चव्हाण यांच्याविरोधात ठोस पुरावा नसल्याचा दावा त्यांचे वकील ॲड. अविनाश भिडे यांनी केला आहे. त्यामुळे मोबाईलमधील माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुरावे तपासासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

दरम्यान, मनीषा यांच्या मृत्यूच्या वेळी नेमक्या कोणत्या घटना घडल्या, निलेश आणि मनीषा यांच्यातील वादाचं कारण काय होतं आणि स्वाती चव्हाण यांचा या प्रकरणाशी नेमका संबंध काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दोन्ही आरोपींची चौकशी करून उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर मृत्यूमागील घटनाक्रम स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकार आत्महत्या होता की घातपात, याचं गूढ आता पोलिसांच्या तपासातून उलगडणार आहे.

follow us