रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर सरकारचा मोठा निर्णय, तुकाराम मुंढेंकडं ‘MPSC’ची नवी जबाबदारी, पण भीमनवार…
विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी सरकारनं अमान्य केली आणि तुकाराम मुंढेंकड मोढी जबाबदारी दिली.
Vivek Bhimanwar : पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सरकारची भूमिका शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केली आहे. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी सरकारनं मान्य केलेली नाही, अशी माहिती त्यांनी बैठकीनंतर दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शासनाच्या वतीनं विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवलं, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असं शिवेंद्रराजे म्हणाले. आचारसंहिता लागू झालेली असल्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे, असं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं नमूद केलं.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा मसुदा रोहित पवार यांच्याकडे सुपूर्द करत असल्याची माहितीही शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. हा मसुदा आपल्याला संध्याकाळी मिळाला होता, असं त्यांनी सांगितलं. याचवेळी तुकाराम मुंढे हे एमपीएससी आयोगाचे सचिव म्हणून काम पाहतील, अशी घोषणाही त्यांनी केली. मात्र, विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य न झाल्यानं विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील पुढील भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागलं आहे.
MPSC संदर्भात आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी गेल्या 11 दिवसांपासून पुण्यामध्ये आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीममवार यांचा राजीनामा घ्यावा, ही त्यामधील प्रमुख मागणी आहे. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी आता हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी राज्याचे मंत्री शिवेंद्रराजेंनी रोहित पवार आणि आंदोलकांची भेट घेतली.
शिवेंद्रराजे भोसले यांनी बैठकीनंतर एस. एम. जोशी पुलावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केलं. याचवेळी एमपीएससी आयोगाच्या सचिवपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
दरम्यान, सरकारनं तयार केलेला मागण्यांबाबतचा मसुदा शिवेंद्रराजे यांनी रोहित पवार यांच्याकडे दिला. रोहित पवार यांनी तो विद्यार्थ्यांसमोर वाचून दाखवला; मात्र त्यात आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत कोणताही उल्लेख नव्हता. त्यामुळे भीमनवार यांचा राजीनामा घेण्याची मागणी रोहित पवार यांनी पुन्हा उपस्थित केली.