ड्रग्ज व्हिडिओवरून हरभजन सिंग अडचणीत; पंजाब पोलिसांसह सत्ताधाऱ्यांचा पलटवार

Harbhajan Singh अमली पदार्थांच्या समस्येचा दावा करत हरभजन सिंग यांनी शेअर केलेला व्हिडिओ राजस्थानमधील असल्याचे पंजाब पोलिसांनी स्पष्ट केले

Harbhajan Singh

Harbhajan Singh Faces Backlash After Sharing Misleading Drug Video : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि भाजपचे राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओवरून पंजाबच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. पंजाबमधील तरुण अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असल्याचा दावा करत हरभजन सिंग यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, पंजाब पोलिसांनी केलेल्या पडताळणीत संबंधित व्हिडिओ पंजाबमधील नसल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

बनावट IAS अधिकारी अटकेत; अजित डोवाल यांच्या टीमचा एजंट असल्याचा दावा

या खुलाशानंतर हरभजन सिंग यांच्या पोस्टवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाब सरकारमधील काही मंत्र्यांनी हरभजन सिंग तसेच भाजपवर निशाणा साधला आहे.

हरभजन सिंग यांनी व्हिडिओसोबत काय म्हटलं?

हरभजन सिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर दोन व्यक्तींचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये दोन तरुण रस्त्याच्या कडेला अस्वस्थ अवस्थेत उभे असल्याचे दिसत आहे. हा प्रकार पंजाबमधील अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येशी जोडत हरभजन सिंग यांनी चिंता व्यक्त केली.

NEET च्या आंदोलनानंतर ग्रामीण शाळा सुधारण्यासाठी सीजेपीची देशव्यापी मोहीम; पालकांनाही केलं आवाहन

नजर लागली आहे यार, आमच्या पंजाबला… सरकाराने पंजाबचे आणि पंजाबी युवकांचे काय हाल केले आहेत. हे सगळे पाहून रडू येते. माफ करा माझ्या पंजाबला… माफ करा पंजाबला. पंजाबला कुठे नेऊन ठेवलेत? जो पंजाब कधीकाळी हिंमत आणि शौर्यासाठी ओळखला जात होता, आज त्याच पंजाबच्या तरुण पिढीला नशेच्या व्यसनांनी घेरून टाकले आहे. अजूनही वेळ आहे—माझा पंजाब वाचवा. पंजाबच्या युवकांना वाचवा.” अशी प्रतिक्रिया हरभजन सिंगने दिली.  दरम्यान, व्हिडिओमध्ये दिसणारे तरुण ‘झोम्बी ड्रग’च्या प्रभावाखाली असल्याचा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. मात्र, हरभजन सिंग यांनी स्वतःच्या पोस्टमध्ये ‘झोम्बी ड्रग’ असा उल्लेख केलेला नव्हता.

 पंजाब पोलिसांनी दिला महत्त्वाचा खुलासा

हरभजन सिंग यांच्या पोस्टनंतर पंजाब पोलिसांनी या व्हिडिओची वस्तुस्थिती तपासली. त्यानंतर पोलिसांनी स्पष्ट केले की, व्हिडिओ पंजाबमधील नसून राजस्थानच्या श्रीगंगानगर येथील आहे. व्हिडिओमध्ये पंजाबी ऑडिओ वापरण्यात आल्याने तो पंजाबमधील असल्याचा गैरसमज निर्माण झाल्याचे पोलिसांनी म्हटले. सोशल मीडियावरील एखाद्या व्हिडिओसोबत पंजाबी गाणे किंवा ऑडिओ असल्याने त्याचे ठिकाण पंजाबच असेल, असे मानता येत नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना कोणतीही माहिती पुढे शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता आणि संबंधित घटना नेमकी कुठे घडली आहे, याची पडताळणी करण्याचे आवाहन केले. या पोस्टमध्ये पंजाब पोलिसांनी हरभजन सिंग यांनाही टॅग केले.

Video : रेवती सुळेंचं रिसेप्शन दिग्गजांची मांंदियाळी अन् पवारांचा अचानक रत्नागिरीच्या तरूणाला इशारा

केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

पंजाब पोलिसांच्या या खुलाशानंतर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली. भाजपच्या नेत्यांकडून पंजाबबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “काल अनेक भाजपच्या लोकांनी मिळून ही खोटी गोष्ट पसरवली. हा आदेश पंतप्रधान कार्यालयातून आला होता का? पंतप्रधान कार्यालय देशात खोट्या गोष्टी पसरवतं का?” असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला.

पंजाबच्या मंत्र्यांकडूनही टीका

या प्रकरणावर पंजाब सरकारमधील मंत्री डॉ. बलजीत कौर यांनीही हरभजन सिंग यांच्यावर निशाणा साधला. राजकीय वरिष्ठांना खूश करण्यासाठी पंजाबची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राजस्थानमधील व्हिडिओ पंजाबमधील असल्याचे भासवून राज्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. पंजाबचे सार्वजनिक बांधकाम मंत्री हरभजन सिंग ईटीओ यांनीही या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली. पंजाबला बदनाम करण्यासाठी चुकीच्या माहितीचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

व्हिडिओतील तरुण नेमक्या कोणत्या अवस्थेत होते?

व्हायरल व्हिडिओमध्ये फेटे घातलेले दोन पुरुष रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसते. ते व्यवस्थित चालण्याचा प्रयत्न करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येते. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या अवस्थेबाबत विविध दावे करण्यात आले. काही नेटकऱ्यांनी हे दोघे अमली पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याचे म्हटले, तर काहींनी त्यांना ‘झोम्बी ड्रग’च्या नशेत असल्याचा दावा केला. मात्र, त्यांची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली होती, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

चुकीच्या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापलं

पंजाब पोलिसांनी व्हिडिओचे ठिकाण स्पष्ट केल्यानंतर हरभजन सिंग यांनी केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः पंजाबमधील अमली पदार्थांच्या समस्येवरून आधीच सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला या प्रकरणामुळे आणखी धार आली आहे. भाजपकडून पंजाब सरकार अमली पदार्थांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे, पंजाब सरकार आणि आम आदमी पक्षाकडून भाजप चुकीची माहिती पसरवून पंजाबची प्रतिमा मलीन करत असल्याचा पलटवार केला जात आहे.

पदवीपेक्षा कौशल्य, आवडीला व्यवसायाची जोड द्या’; अलार्ड विद्यापीठातर्फे ‘Diksharambh 2026’ कार्यक्रम उत्साहात

त्यामुळे एका व्हायरल व्हिडिओपासून सुरू झालेला हा वाद आता पंजाबमधील अमली पदार्थांचा प्रश्न, सोशल मीडियावरील माहितीची सत्यता आणि त्याचा राजकीय वापर या तीनही मुद्द्यांभोवती केंद्रित झाला आहे.

follow us