FDAची धडक कारवाई; मुंबईत AYUB’Sचा परवाना निलंबित, पुणे-जळगावमध्ये संशयित अन्नसाठा जप्त
Maharashtra FDA मुंबईतील AYUB’Sसह अनेक आस्थापनांचे परवाने निलंबित, तर पुणे आणि जळगावमध्ये संशयित अन्नसाठा जप्त.
Maharashtra FDA Cracks Down on Food Safety Violations Across State : नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात धडक कारवाई सुरू केली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई होत आहे. दरम्यान मुंबईच्या फोर्ट परिसरातील प्रसिद्ध AYUB’S या आस्थापनामध्ये अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने त्याचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच कुर्ला पश्चिम येथील मेसर्स संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेचा अन्न व्यवसाय परवानाही तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.
Onion Price : ‘या’ भागात 35 रुपये किलो मिळणार कांदा; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
अन्न व औषध प्रशासनाकडून हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, क्लब, बेकरी आणि इतर खाद्य आस्थापनांची नियमित तपासणी केली जात आहे. या तपासणीमध्ये अन्नाची गुणवत्ता, साठवणूक, स्वच्छता आणि अन्न हाताळण्याच्या पद्धतींची पाहणी केली जाते. नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
AYUB’Sमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली 22 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईतील फोर्ट परिसरातील AYUB’S या आस्थापनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षेशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या.
आस्थापनामध्ये अन्नपदार्थ योग्य तापमानात ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याचे आढळले. विशेषतः अंड्यांसारखे लवकर खराब होणारे पदार्थ खोलीच्या तापमानावर अयोग्य पद्धतीने ठेवण्यात आले होते. कच्चे आणि शिजवलेले अन्न स्वतंत्रपणे ठेवण्याची योग्य व्यवस्था नसल्याचेही समोर आले.
राहुल गांधी पुन्हा पुण्यात येणार; आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देणार?
याशिवाय अन्न तयार करण्याच्या परिसरात अस्वच्छता, उघडी आणि व्यवस्थित साफ न केलेली गटारे, ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि घरमाशांचा वावर आढळून आला. कीटक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनाही अपुऱ्या असल्याचे तपासणीत दिसून आले.
अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेवरही प्रश्न
अन्न तयार करणाऱ्या आणि हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक वैयक्तिक स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध नसल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले. तसेच तयार होणाऱ्या अन्नपदार्थांची आवश्यक तपासणी केली जात नसल्याचे आढळले.
अन्नपदार्थ कुठून आले, त्यांची साठवणूक कशी करण्यात आली आणि ते कोणत्या प्रक्रियेतून ग्राहकांपर्यंत पोहोचतात, याची नोंद ठेवण्याच्या व्यवस्थेतही त्रुटी आढळल्या.
या सर्व बाबी एकत्रितपणे पाहता आस्थापनातील अन्न सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत अन्न दूषित होण्याबरोबरच कच्च्या आणि शिजवलेल्या पदार्थांचा एकमेकांशी संपर्क येऊन ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
रुपाली चाकणकरांवर दिपाली सय्यदने ठोकला 500 कोटींचा दावा? नेमका वाद काय?
विशेषतः अंडी आणि इतर नाशवंत पदार्थ योग्य तापमानात न ठेवल्यास त्यामध्ये हानिकारक सूक्ष्मजीवांची वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नजन्य आजारांचा धोका वाढू शकतो.
23 ऑगस्टपासून परवाना निलंबित
तपासणीमध्ये आढळलेल्या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर AYUB’Sचा FSSAI परवाना क्रमांक 11521001000585 हा 23 ऑगस्ट 2026 पासून निलंबित करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 आणि त्याअंतर्गत लागू नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
कुर्ल्यातील संस्थेवरही तत्काळ कारवाई
दरम्यान, कुर्ला पश्चिम येथील मेसर्स संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेवरही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. वाडिया इस्टेट, एम. एन. रोड, बिल्डिंग क्रमांक 16, कुर्ला पश्चिम येथील या संस्थेचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.
या संस्थेविरोधात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 तसेच संबंधित नियम आणि नियमावलीनुसार कारवाई करण्यात आली असून, पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया नियमानुसार केली जाणार आहे.
Donald Trump : ट्रम्प यांचे वजन 10 किलोंनी वाढले; जगातील सर्वात ‘वजनदार’ 5 नेते कोण?
इतर ठिकाणी केलेली कारवाई
● नागपुरातील दोन खाद्य आस्थापनांवर FDAची कारवाई; स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने दोन्हींचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले. बुर्हाणपूर जिलेबी सेंटर आणि स्टेप इन रेस्टॉरंट या आस्थापनांवर नियमित तपासणीनंतर ही प्रशासकीय कारवाई करण्यात आली.
● पुण्यातील मेसर्स त्रिमूर्ती एंटरप्रायझेसवर विनापरवाना अन्न व्यवसाय केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. तपासणीत काही अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय आढळला, तसेच लेबलिंगमध्येही त्रुटी होत्या. कारवाईत 4,317 किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. या जप्त साठ्याची अंदाजे किंमत 7 लाख 26 हजार 966 रुपये आहे.
● जळगावच्या यावल तालुक्यात संशयित भेसळयुक्त सोयाबीन तेलावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. आडावद येथील झम झम किराणा दुकानातून 396.5 किलो संशयित सोयाबीन तेल आढळून आले. तेलाचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून, अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे. नागरिकांनी खुले खाद्यतेल खरेदी करताना गुणवत्ता आणि पॅकिंगची खात्री करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अन्न सुरक्षेशी तडजोड नाही
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. विशेषतः ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या गंभीर किंवा वारंवार होणाऱ्या त्रुटी आढळल्यास संबंधित अन्न व्यावसायिकांविरोधात परवाना निलंबनासह कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
साखरेचा तुटवडा नाही! व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळं दरवाढ, लवकरच भाव कमी होण्याची शक्यता
राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, क्लब, बेकरी आणि इतर खाद्य आस्थापनांची तपासणी यापुढेही सुरू राहणार असून, नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी प्रशासनाकडून नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे.