प्रियकरासाठी MPSC चा पेपर फोडला, पण फटका बसला अनेकांना; परीक्षेतील धक्कादायक प्रकार उघड
FDA Drug Inspector paper Leak प्रेमप्रकरणातून MPSC पेपरफुटीचा धक्कादायक प्रकार समोर आला. भरती प्रक्रिया रद्द झाल्याने अनेक उमेदवारांना फटका.
MPSC FDA Drug Inspector Group-B Exam paper leak: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटी (FDA Drug Inspector paper Leak) प्रकरणातील आता प्रेमप्रकरणाचा (Love Affair) धक्कादायक अँगल समोर आला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, एका प्रियकराने MPSCमधील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी संगनमत करून प्रश्नसंच मिळवल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. विशेष म्हणजे, फुटलेला प्रश्नसंच केवळ एका उमेदवारापर्यंत पोहोचल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे सांगितले जात आहे.
साखरेच्या दरवाढीने ग्राहकांना झटका! D-Mart सह क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आता 5 किलोच साखर मिळणार
22 मार्च 2026 रोजी झालेल्या औषध निरीक्षक पदाच्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच आधीच मिळाला होता आणि त्याचा त्याला परीक्षेत फायदा झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याचे MPSCने आपल्या निर्णयात नमूदही केले आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान प्रेमसंबंधातून पेपर मिळवण्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एका उमेदवाराला फायदा मिळवून देण्यासाठी MPSCमधील कर्मचाऱ्याशी संपर्क साधण्यात आला आणि त्यातून प्रश्नसंच मिळवण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे. मात्र, या प्रकरणातील नेमकी भूमिका आणि संपूर्ण साखळीबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
प्रियकरासाठी पेपरफुटी, पण शेकडो उमेदवारांना फटका
पेपर केवळ एका उमेदवारापर्यंत पोहोचला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष असला, तरी या प्रकाराचा फटका परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना सहन करावा लागणार आहे. गैरप्रकाराची शक्यता लक्षात घेऊन आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
कांद्याच्या दरवाढीला लगाम घालण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; ‘कांदा एक्सप्रेस’ आज दिल्लीत पोहोचणार
या परीक्षेसाठी हजारो उमेदवारांनी मेहनत घेतली होती. चाळणी परीक्षा, निकाल आणि मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भरती अंतिम टप्प्यात पोहोचली होती. मात्र, एका उमेदवाराला अनुचित फायदा झाल्याच्या निष्कर्षामुळे संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने घ्यावी लागणार आहे.
22 मार्चला झाली होती परीक्षा
औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची चाळणी परीक्षा 22 मार्च 2026 रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 12 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला. चाळणी परीक्षेनंतर 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले.
MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; कंत्राटदारांच्या प्रश्नावरूनही सरकारला घेरलं
यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती 1 जुलै ते 22 जुलै 2026 या कालावधीत घेण्यात आल्या. 22 जुलै रोजी मुलाखती पूर्ण झाल्यानंतर 485 पात्र आणि 3 अपात्र अशा 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.
मात्र, पेपरफुटीच्या तक्रारी आणि प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या निष्कर्षांनंतर आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.
फेरपरीक्षा होणार
आयोगाकडून आता औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे. तसेच फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
फेरपरीक्षेची तारीख स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, प्रेमप्रकरणातून एका उमेदवाराला फायदा मिळवून देण्यासाठी प्रश्नसंच मिळवण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांसमोर असून, या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींची भूमिका काय होती, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
एका उमेदवारासाठी कथितरित्या फुटलेला पेपर आता शेकडो उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फेरणारा ठरला असून, MPSCच्या परीक्षा व्यवस्थेतील सुरक्षेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.