दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी सचिन अंदुरेला हायकोर्टाकडून जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर करत जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
Sachin Andure Gets Bail in Narendra Dabholkar Murder Case: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तसेच त्याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आली आहे.
रामदास आठवलेंची अभिजीत दिपकेंना मोठी ऑफर; अध्यक्षपदाची जबाबदारी?
न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी (18 ऑगस्ट) या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान खंडपीठाने सचिन अंदुरेला दिलासा देत त्याचा जामीन अर्ज मंजूर केला.
विशेष यूएपीए कोर्टाच्या निकालाला दिलं होतं आव्हान
सचिन अंदुरेने विशेष यूएपीए न्यायालयाच्या 10 मे 2024 रोजीच्या निकालाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं. या निकालात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. अंतिम निर्णय होईपर्यंत आपल्याला जामीन देण्यात यावा आणि जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी अंदुरेने केली होती.
अंदुरेच्या वतीने अॅडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यानंतर हायकोर्टाने अंदुरेला जामीन देण्याचा निर्णय घेत जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली.
शरद कळसकरलाही यापूर्वी जामीन
या प्रकरणातील आणखी एक आरोपी शरद कळसकर याला एप्रिल महिन्यातच मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे आता दाभोलकर हत्या प्रकरणातील दोन्ही प्रमुख आरोपींना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.
फडणवीसांना मंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेपाचा अधिकार; मंत्र्यांच्या निर्णयांवर परिणाम होणार?
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात सकाळच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी दीर्घकाळ तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. विशेष यूएपीए न्यायालयाने 2024 मध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यासह आरोपींना शिक्षा सुनावली होती. आता हायकोर्टातील अपीलाच्या सुनावणीदरम्यान अंदुरेला जामीन मिळाल्याने या प्रकरणाला पुन्हा एकदा महत्त्वाचं वळण मिळालं आहे.