पुण्यात कॉलेज प्रशासनाचा कारभार देवभरोसे! 19 वर्षीय विद्यार्थिनी 14 तास लिफ्टमध्ये अडकली, रात्रभर शोधाशोध अन् सकाळी सुटका
Pune Student Trapped in Lift : पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकली होती.
Pune Student Trapped in Lift : पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात सुरक्षेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे शिक्षण घेणारी 19 वर्षीय विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकून पडली. बुधवारी दुपारी लेक्चर संपल्यानंतर ती लिफ्टने जात असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि लिफ्ट पाचव्या व सहाव्या मजल्यादरम्यान बंद पडली. विशेष म्हणजे, या घटनेची माहिती कोणालाही नसल्याने विद्यार्थिनीला मदत मिळू शकली नाही. अन्न आणि पाण्याविना तिला लिफ्टमध्येच रात्र काढावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थिनी लेक्चर संपवून लिफ्टमध्ये गेली होती. त्यावेळी लिफ्टमध्ये ती एकटीच होती. काही वेळातच अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने लिफ्ट जागेवरच बंद पडली. पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या मध्ये लिफ्ट अडकल्याने तिला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला, मात्र तिचा आवाज ऐकूनही कोणी मदतीला आले नाही.
दुसरीकडे, विद्यार्थिनी घरी न पोहोचल्याने तिचे कुटुंबीय प्रचंड चिंतेत पडले होते. तिच्याशी संपर्क होत नसल्याने नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलीस, महाविद्यालयाचे कर्मचारी आणि कुटुंबीयांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली. रात्रभर शोध घेऊनही विद्यार्थिनी नेमकी कुठे आहे, याचा थांगपत्ता लागत नव्हता.
पुणे जिल्हा परिषदेचा ज्ञान सेतू उपक्रम; 51 विद्यार्थी आणि 9 शिक्षक जम्मू-काश्मीर, आसाम-अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर
गुरुवारी सकाळी इमारतीची लिफ्ट पुन्हा सुरू झाल्यानंतर या संपूर्ण प्रकाराचा उलगडा झाला. तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीची अखेर सुटका करण्यात आली. अन्न-पाण्याविना इतका वेळ बंद जागेत राहिल्याने ती प्रचंड घाबरली होती. विशेष म्हणजे, संपूर्ण रात्रभर शोध सुरू असतानाही ती महाविद्यालयातील लिफ्टमध्ये अडकली असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नव्हते. या घटनेने महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.
या घटनेनंतर महाविद्यालयातील लिफ्टची देखभाल, वीजपुरवठ्याची व्यवस्था आणि आपत्कालीन मदत यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लिफ्टमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीला मदत मिळण्यासाठी अलार्म किंवा संपर्क यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या सुविधा प्रत्यक्षात किती सक्षम आहेत, याचीही चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे महाविद्यालय प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत चौकशी समिती स्थापन केली आहे. लिफ्टमधील तांत्रिक बिघाड, वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण आणि आपत्कालीन यंत्रणेतील त्रुटींची तपासणी समितीकडून केली जाणार आहे. लिफ्टचा वीजपुरवठा जवळपास 5 ते 6 तास खंडित होता, अशी माहिती महाविद्यालयाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला असून, जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असेही महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.