विलीनीकरणाच्या विषयात भाजपने न बोललेलंच बरं! रोहित पवारांचा फडणवीसांना थेट इशारा

आमच्याशिवाय राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे म्हणजे सत्तेचा अहंकार असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 12T111404.344

Rohit Pawar’s direct warning to Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन-चार दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर या चर्चांना सुरूवात झाली. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार हयात असते, 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते, असा दावा केला. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी वेग आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या चर्चांवर भाष्य करत आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण होणार नाही, असे वक्तव्य केले. मुख्यमंत्र्यांच्या याच विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विलीनीकरणाची चर्चाच नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपसोबत सत्तेत असताना विलीनीकरणाचा विषयच येत नाही, मग आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे म्हणजे सत्तेचा अहंकार असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.

इतकाच नाही, तर रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप देखील केले आहेत. पीसीएमसी अर्थात पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्य काळात मुंढवा प्राकारणाचा वापर करून अजित पवार यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, अशा प्रयत्ननानंतरही अजितदादांनी भाजपला कणभर देखील भीक घातली नव्हती, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

1 नोव्हेंबरपासून सरकारी रुग्णालयांमधील मोफत रक्तचाचण्या बंद, सरकारच्या ढिसाळ कारभाराचा रुग्णांना फटका

तसंच, अजित पवार यांना ब्लॅकमेल कोण करत होतं? आणि ब्लॅकमेल करण्याचे आदेश नेमके कुणी दिले होते? असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत. ब्लॅकमेलिंगच्या पायावर ज्यांचं राजकारण उभं आहे, अशा भाजपने आणि त्यांच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या विषयात न बोललेलंच बरं, असा थेट इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.

दरम्यान, याआधीही रोहित पवार यांनी विलीनीकरणाच्या चर्चांवर प्रश्न उपस्थित केले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर काही नेत्यांनी विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले होते. मात्र, आता अजितदादा हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या, अशी विधानं केली जात आहेत. या बदललेल्या भूमिकेमागे नेमकं राजकारण काय, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला होता.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावरून रोहित पवारांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा विषय आता केवळ पक्षांतर्गत चर्चेपुरता मर्यादित न राहता भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील राजकीय संघर्षाचा नवा मुद्दा बनला आहे. रोहित पवारांच्या या आरोपांवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते आणि विलीनीकरणाबाबत दोन्ही राष्ट्रवादींची अधिकृत भूमिका काय असणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

follow us