शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट! शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण, कपिल सिब्बल पुन्हा मैदानात
Shiv Sena Symbol Case : शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून कपिल सिब्बल यांच्या रिजॉइंडरमुळं सर्वोच्च सुनावणीकडं लक्ष.
Shiv Sena Symbol Case : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून (Shivsena) सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. सलग तीन सुनावण्यांमध्ये त्यांनी शिंदे गटाची बाजू मांडली. आजच्या सुनावणीत त्यांनी 2019 मध्ये कर्नाटकात घडलेल्या सत्तास्थापनेच्या प्रकरणाचाही दाखला दिला.
शिंदे गटाच्या आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्यातील दहाव्या अनुसूचीनुसार अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असा दावा ध्रुव मेहता यांनी केला. संबंधित गटातील कोणत्याही पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नव्हता, हा मुद्दाही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ पक्षांतराच्या दृष्टीने पाहता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आपला युक्तिवाद अधिक स्पष्ट करताना मेहता यांनी भाजप आणि शिवसेनेच्या तत्कालीन युतीचा संदर्भ दिला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून मतभेद निर्माण झाले आणि सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर ही युती तुटली. यामुळे शिवसेनेतील अनेक पदाधिकारी नाराज झाले होते, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सरकार सत्तेवर होते. मात्र त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरकार वाचवण्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे यांनी सत्तांतर घडवून आणल्यामुळे सरकार कोसळले, असे म्हणता येणार नाही, असा दावा ध्रुव मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.
दरम्यान, शिंदे गटाच्या वतीने आजचा युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. यानंतर ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात पुन्हा आपली बाजू मांडण्याची परवानगी मागितली. मला या प्रकरणात रिजॉइंडर सादर करायचा आहे. त्यासाठी काही वेळ देण्यात यावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यामुळे आता ठाकरे गटाला शिंदे गटाच्या युक्तिवादाला प्रत्युत्तर देण्याची संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे, ध्रुव मेहता यांनी सलग तीन सुनावण्यांमध्ये शिंदे गटाची बाजू प्रभावीपणे मांडल्यानंतर आज त्यांचा युक्तिवाद संपला आहे. मात्र कपिल सिब्बल यांच्या रिजॉइंडरमुळे या प्रकरणातील कायदेशीर लढाईला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. सिब्बल आपल्या प्रत्युत्तरात कोणते मुद्दे उपस्थित करणार आणि शिंदे गटाच्या दाव्यांना कशा प्रकारे उत्तर देणार, याकडे आता राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.