जामखेडमध्ये भीषण अपघात! कारवरील नियंत्रण सुटल्याने कार विहिरीत कोसळली, चौघांचा जागीच मृत्यू…
Jamkhed Accident : जामखेड तालुक्यातील जांबवडी (Jambwadi) रस्त्यावर भीषण (Jamkhed Accident) अपघात घडला आहे. जांबवाडी येथील मातकुळी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आज (दि. १५ जानेवारी) रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास भरधाव वेगात असलेली बोलेरो जीप (Bolero Jeep) विहिरीत पडली. या दुर्दैवी घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
मोठी बातमी, संतोष देखमुख अन् सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात होणार न्यायालयीन चौकशी
अशोक विठ्ठल शेळके (वय २९, रा. जांबवाडी), रामहरी गंगाधर शेळके (वय ३५, रा. जांबवाडी), किशोर मोहन पवार (वय ३०, रा. जांबवाडी), चक्रपाणी सुनील बारस्कर (वय २५, रा. राळेभात वस्ती) अशी मृतांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, चक्रपाणी सुनील बारस्कर हा एका पवनचक्की कंपनीच्या गाडीवर चालक होता. पवनचक्की कंपनीचे काम बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सुरू आहे. नेहमीप्रमाणे आपले काम संपवून, ते सर्वजण बोलेरो जीप (क्रमांक MH 23 AU 8485) मधून मातकुळीकडून जांबवाडी मार्गे जामखेडला येत होते. दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास हे चार तरुण जामखेडकडे जात होते. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जीप जांबवाडीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या पन्नास फूट खोल विहिरीत पडली. यावेळी मोठा आवाज झाला. जवळच रस्त्याचे खडीकरण काम सुरू असल्याने तेथील मजुरांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विहिरीत पडलेल्या चार तरुणांना बाहेर काढले.
कराडवर मकोका, परळी बंद; पंकजा म्हणाल्या, ‘या गोष्टी माझ्यासाठी मॅटर करत नाहीत…’
चौघांनाही उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याआधीच चौघांचा मृत्यू झाला होता. अद्यापही बोलेरो गाडी विहिरीत आहे.
या घटनेची माहिती मिळताच जामखेड ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी जमा झाली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत चार जणांपैकी दोघे विवाहित होते. त्यांना लहान-लहान मुले आहेत. तर दोघेही अविवाहित होते. दरम्यान, या अपघाताच्या भीषण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.