कोविडमध्ये साधेपणाने लग्न झाली, त्यांना पोरं झाली नाहीत का? विखे पाटलांचं वक्तव्य चर्चेत
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळावा आणि लग्नसमारंभ साध्या पद्धतीने करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Vikhe Patil’s statement sparks discussion : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. विखे कुटुंबातील अंतर्गत वाद समोर आल्यानंतर आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लग्नसमारंभाबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळावा आणि लग्नसमारंभ साध्या पद्धतीने करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे बंधू आणि शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांची मुलगी नीला विखे स्वीडनमध्ये खासदार म्हणून निवडून आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या.
मात्र, गेल्या 10 ते 12 वर्षांपासून आपला त्यांच्याशी कोणताही संपर्क नसल्याचे नीला विखे यांनी म्हटले होते. भारतात आल्यानंतर देखील आपण त्यांची भेट घेत नसल्याचे सांगत आपल्या विजयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे विखे कुटुंबातील मतभेत चर्चेत आले होते. दरम्यान दुष्काळी परिस्थितीवर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांना लग्नसमारंभ साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन केले. दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे डामडौलाने लग्न न करता साध्या पद्धतीने लग्न करा. कोव्हीडमध्ये साधेपणाने लग्न झाली, त्यांना पोरं झाली नाहीत का? जो मोठेपणा करतो, तो यावर्षी तरी थांबवा, अशी माझी विनंती आहे. पाऊस कमी आहे, असे विखे पाटील म्हणाले.
चोरीला गेलेला मेंदू परत आणण्यासाठी समिती नेमा, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे. विशेषतः कोव्हीड काळातील लग्नाची उदाहरण देत त्यांनी केलेल्या विधानाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभामधील खर्च कमी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील विखे पाटील यांनी भाष्य केले. तुकाराम मुंढे यांच्यमुळे दुधातील भेसळ थांबली असून त्यामुळे दुधाच्या दरात वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. याचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाला असून त्यांना दिलासा मिळाल्याचे देखील त्यांनी सांगितले. दुधातील भेसळीला आला बसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळण्यास मदत झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत सरकार गंभीर असल्याचे देखील विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात भूमिका जाहीर केली असून एनडीआरएफच्या निकषांपेक्षाही अधिक मदत देण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या चार ते पाच दिवसांत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
एल निनो’चा प्रभाव किती दिवस राहणार?; दुष्काळाच्या संकटावर मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती
दुसरीकडे, विरोधक दुष्काळाच्या मुद्द्यावरही राजकारण करत असल्याची टीका विखे पाटील यांनी केली. विरोधकांकडे आता कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्याकडे लोकांचा आणि मुद्द्यांचाही दुष्काळ आहे, असा टोलाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला. त्यामुळे एकीकडे लग्नसमारंभांबाबत केलेले विधान, तर दुसरीकडे दुष्काळाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर केलेली टीका, अशा दोन्ही कारणांमुळे विखे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.