कधीकाळी वडिलांच्या अंत्यविधीसाठीही पैसे नव्हते; आता फॉर्च्युनरमधून कामावर येतो, वाचा संघर्षमय कहाणी

बंटवाल नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तीर्थप्रसाद यांनीही सेसप्पा यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

News Photo   2026 08 24T211451.681

मंगळुरूतील बंटवाल नगर पालिकेचा (Municipal) एक सफाई कर्मचारी सध्या त्यांच्या फॉर्च्युनर कारमुळे चर्चेत आहे. रोज सकाळी महागड्या फॉर्च्युनरमधून कामावर येणारे सेसप्पा ज्या परिसरात त्यांची ड्युटी असते, तिथेही याच कारने जातात. विशेष म्हणजे, यापूर्वीही ते मारुती 800, अल्टो आणि स्कॉर्पिओ यांसारख्या खासगी वाहनांमधून साफसफाईच्या कामासाठी जात होते. आता त्यांनी या सर्व गाड्या विकून सेकंड हँड फॉर्च्युनर खरेदी केली आहे. त्यामुळे त्यांना कारमधून कामावर येताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. मात्र, या कारमागे सेसप्पा यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाची आणि मेहनतीची कहाणी आहे.

सेसप्पा 1996 पासून कर्नाटकातील मंगळुरूजवळच्या बंटवाल नगर पालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. नोकरीच्या सुरुवातीला त्यांना दिवसाला अवघी 50 रुपये मजुरी मिळायची. काही वर्षांनंतर त्यांना पालिकेच्या सेवेत कायम करण्यात आलं. स्वतःची कार असावी, हे त्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरीसोबत शेती आणि डेअरी व्यवसायही सांभाळला. उत्पन्न वाढवण्यासाठी मिळेल ते काम करण्याची त्यांची तयारी होती.

सेसप्पा आणि त्यांच्या मुलांना वाहनांची विशेष आवड आहे. ही आवड पूर्ण करण्यासाठी त्यांनी कष्टाबरोबरच गरजेनुसार कर्जही घेतलं. सर्वप्रथम त्यांनी मारुती 800 खरेदी केली. त्यानंतर अल्टो आणि स्कॉर्पिओ घेतली. प्रत्येक वाहनानंतर पुढचं वाहन घेण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं आणि अखेर सेकंड हँड फॉर्च्युनर खरेदी केली. त्यामुळे आज महागड्या कारमधून कामावर येणारा हा सफाई कर्मचारी अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

मोठ्या साखर खरेदीदारांवर सरकारची नजर; 15 दिवसांपेक्षा जास्त साठा ठेवता येणार नाही

मात्र, सेसप्पा यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी दिवस काढले. एकेकाळी त्यांना दारूचं व्यसनही लागलं होतं. वडिलांचं निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठीही त्यांच्या हातात पैसे नव्हते. मदतीला कोणीही पुढे न आल्याने नेत्रावती नदीच्या तीरावर त्यांच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या कठीण काळाने सेसप्पा यांना आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवलं.

बंटवाल पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या बेलियप्पा यांच्यासोबत झालेल्या एका संवादाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, असं सेसप्पा सांगतात. त्यानंतर त्यांनी दारू सोडण्याचा आणि आयुष्य नव्याने उभं करण्याचा निर्णय घेतला. आज पत्नी आणि दोन मुलांसोबत ते समाधानी जीवन जगत आहेत. नोकरीसोबत शेती आणि डेअरीच्या माध्यमातून त्यांनी आपली आर्थिक परिस्थितीही सुधारली.

बंटवाल नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तीर्थप्रसाद यांनीही सेसप्पा यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. ते शांत, प्रामाणिक आणि मेहनती कर्मचारी असल्याचं त्यांनी सांगितलं. सेसप्पा यांच्याकडे सोपवलेली कामं ते नियमितपणे पूर्ण करतात आणि त्यांच्या कामाबाबत आजवर कोणतीही तक्रार निर्माण झालेली नाही. ते दररोज सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास कामावर हजर होतात. बीसी रोडवरील सरकारी कार्यालयांची साफसफाई करण्यासोबतच कचरा गाडी चालवण्याची जबाबदारीही ते सांभाळतात. कार्यालयीन काम संपल्यानंतर दुपारी ते शेती आणि डेअरीची कामं पाहतात. त्यामुळे फॉर्च्युनरमधून कामावर येणाऱ्या सेसप्पा यांच्याकडे केवळ महागडी कार पाहण्यापेक्षा त्यामागचा संघर्ष आणि मेहनत पाहणं अधिक महत्त्वाचं ठरतं.

Tags

follow us