किरकोळ गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे कमविणार; अल्गो ट्रेडिंगचा पर्याय मिळणार ?
Algo Trading New Rules: तुम्ही दररोज शेअर बाजाराच्या बातम्या बघता. कोणता शेअर वाढला, कोणता शेअर पडला. निफ्टी फिफ्टी, सेन्सेक्स, बँक निफ्टीमध्ये वाढ, घट झाली. गुंतवणूकदारांना एेेवढे कमविले. गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये बुडाले या बातम्या कानावर येऊन धडकतात. त्यात फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग करणारे हे दर मिनिटाला वेगवेगळे चॉर्ट पॅटर्न बघून ट्रेड घेत असतात. परंतु त्यात चूक झाल्यास पैसे गमविण्याचा धोका असतो. ट्रेडिंगमध्ये शंभर पैकी 93 लोकांना नुकसानच होते. त्यात केवळ सात टक्के लोक पैसे कमवितात, असा सेबीचा रिपोर्ट आहे. किरकोळ गुंतवणूकदारालाही शेअर बाजारात फायदा होण्यासाठी अल्गो ट्रेडिंगचा पर्याय देण्याचा विचार शेअर बाजार नियामक संस्था सेबीचा (Sebi) आहे. हे अल्गो ट्रेडिंग काय आहे ? किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail Investors) फायदा होऊ शकतो का ? हे विषय सोपामधून जाणून घेऊया…
अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय?
अल्गो ट्रेडिंगमध्ये कॉम्प्युटरच्या मदतीने ऑटोमेटेड ट्रेडिंग केले जाते. यासाठी आधी कॉम्प्युटर्सला प्रोग्राम्ड केले जाते. कॉम्प्युटर्सला व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण व निर्देश दिले जातात. कॉम्प्युटर्स या निर्देशांचे पालन करून अवघ्या काही सेकंदात असंख्य व्यवहार पूर्ण करतात. याद्वारे नुकसान कमी होण्याची देखील शक्यता निर्माण होते. सेबीने किरकोळ गुंतवणूकदारांना अल्गो-आधारित ट्रेडिंगमध्ये भाग घेण्याची परवानगी देण्याची योजना आखलीय. सध्या फक्त मोठ्या गुंतवणूकदारांना संगणक किंवा अल्गोरिदम आधारित ट्रेडिंगमध्ये भाग घेण्याची परवानगी आहे. ज्याला सामान्यतः अल्गो ट्रेडिंग म्हणतात. बाजार तज्ज्ञांच्या मते अल्गो ट्रेडिंगमुळे संस्थात्मक आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांना समान संधी मिळू शकणार आहे. या प्रस्तावांवर सेबीने गुंतवणूकदारांची मते मागवली आहेत.
काय फायदा होतो ?
अल्गो ट्रेडिंग हा एक स्मार्ट रोबोट आहे. जो शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी काम करतो आणि गुंतवणूकदारांना अधिक नफा मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. हा प्रत्यक्षात एक संगणकीय प्रोग्राम आहे. या प्रोग्राममध्ये काही विशेष नियम आहेत, जसे की शेअरची किंमत कमी असेल तेव्हा ते विकत घ्या किंवा शेअरची किंमत जास्त झाल्यास ते विकून टाका, असा प्रोग्राम सेट करू शकता. त्यामुळे अशा प्रकारे अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. हा प्रोग्राम खूप जलद कार्य करतो आणि इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा चांगले निर्णय घेऊ शकतो. तुम्ही व्यस्त असाल, तर तुम्ही एक संगणक प्रोग्राम तयार करू शकता जो प्रत्येक क्षणी शेअरच्या किमतीचे निरीक्षण करेल. तुमच्या अटी पूर्ण करताच प्रोग्राम आपोआप ऑर्डर देईल. शेअरची किंमत आणि आलेख यांचे सतत निरीक्षण करण्याची गरज नाही. तसेच मॅन्युअली ऑर्डर देण्याची गरज नाही. अल्गो ट्रेडिंगद्वारे, ऑर्डर जलदपणे दिल्या जातील आणि बाजारात तरलता देखील वाढेल. जर सेबीचा हा प्रस्ताव लागू झाला तर ज्या गुंतवणूकदारांना पूर्ण सुरक्षिततेसह अल्गो वापरून ट्रेड करणाऱ्यांचा फायदा होईल. यावर सेबीचे म्हणणे आहे की अल्गो ट्रेडिंगच्या बदलत्या स्वरूपादरम्यान छोट्या गुंतवणूकदारांमध्ये त्याची मागणी वाढत आहे. लहान गुंतवणूकदार योग्य मार्गाने अल्गो ट्रेडिंगमध्ये सहभागी होऊ शकतात.
मोठ्या गुंतवणूकदारांना फायदा होतो का ?
याबाबत एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज संचालक अजय गर्ग यांनी सेबीच्या अभ्यासाची माहिती दिली. त्यात डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगवरील अलीकडील SEBI अभ्यासात असे दिसून आले आहे की 2024 मध्ये परदेशी फंडांच्या नफ्यांपैकी सुमारे 97% आणि संस्थापक गुंतवणूकदारांच्या नफ्यांपैकी 96% अल्गो ट्रेडिंगमधून उत्पन्न मिळाले आहे.
किरकोळ गुंतवणुकदारांना होणार फायदा ?
गेल्या काही वर्षात भारतात किरकोळ गुंतवणुकदारांची संख्या वाढली आहे. देशात 16 कोटी डिमॅट खाती आहेत. शहराबरोबर ग्रामीण भागातील तरुणही शेअर बाजारात गुंतवणूक करत आहे. फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत आहे. परंतु बाजाराबाबत अभ्यास नसल्याने अनेकांचे पैसे बाजारात बुडत आहेत. अनेकदा वेगवेगळ्या युट्यूबवरून माहिती घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते. त्यामुळेही नुकसान होत आहे. सेबीने किरकोळ गुंतवणूकदारांनाही अल्गो ट्रेडिंगचा पर्याय दिल्यास ते ही शेअर बाजारात कमाई करू शकतात, असे शेअर बाजारातील तज्ञ्ज्ञांचे म्हणणे आहे.