हुंडा, शिक्षण नव्हे तर, खराब CIBIL ने मोडलं लग्न; अकोल्यातील मोडलेल्या लग्नाची तुफान चर्चा!

महाराष्ट्रातील अकोला येथील मूर्तिजापूरमध्ये लग्नाच्या घटीका समीप येण्याच्या उंबरठ्यावर असतानाच लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. हे लग्न हुंडा किंवा अन्य कारणांमुळे नव्हे तर, सीबील स्कोअर (Cibil Score) खराब असल्यामुळे मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. हे ऐकायला जरी एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे वाटत असेल मात्र, सध्या या लग्नाची आणि त्यासोबतच सिबील स्कोअरची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. नेमके हे प्रकरण काय? सिबिल स्कोअर म्हणजे काय? तो इतका महत्त्वाचा का आणि तो कसा सुधारायचा? याविषयी जाणून घेऊया.
Inter Cast Marriage Couple : लव्ह मॅरेज करणाऱ्यांचं टेन्शन मिटलं! सरकारचा मोठा निर्णय
प्रकरण नेमकं काय?
अकोल्याजवळील मूर्तिजापूरमध्ये कुटुंबांनी संभाषणातून वधू आणि वराच्या लग्नास सहमती दर्शवली. परंतु, जेव्हा वधूच्या काकांनी वराचा सिबिल स्कोअर तपासण्याचा आग्रह धरला तेव्हा परिस्थिती अचानक बदलली. मुलाचा सिबिल स्कोअर बघून मुलीचे काका नाखूष होते. वराकडे वेगवेगळ्या बँकांकडून अनेक कर्जे होती आणि त्याचा सिबिल स्कोअर खूपच कमी होता. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वधूच्या कुटुंबीयांनी एकमताने काकांची चिंता समजून निर्णय मान्य करत लग्नाचा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला.
CIB Score: आरबीआयकडून सिबील स्कोरबाबत मोठे बदल; काय आहेत बदल? अन् केव्हा होणार लागू?
लग्नापूर्वी आर्थिक सुसंगतता महत्त्वाची का?
पूर्वी लग्नापूर्वी फक्त कौटुंबिक पार्श्वभूमी, नातेसंबंध आणि वैयक्तिक गुणांचा विचार केला जात असे, परंतु बदलत्या काळानुसार आणि वाढते खर्च बघता आर्थिक सुसंगतता देखील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. कारण वधू आणि वराच्या आर्थिक सवयी जुळत नसतील तर, लग्नानंतर पैशांवरून वादाचे प्रसंग ओढवण्याची दाट शक्यता असते. त्यात जर जोडीदारावर खूप कर्ज असेल आणि ते परतफेड करण्याची कोणतीही योजना नसेल तर, भविष्यात समस्या वाढू शकतात.
भारतात, नातेसंबंधांमध्ये पैशांबद्दल किंवा आर्थिक व्यवहारांबाबत उघडपणे बोलणे अजूनही सामान्य नाही. YouGov च्या याबाबतच्या सर्वेक्षणानुसार 32 % भारतीय मिलेनियल्स आणि जनरल झेडने त्यांच्या जोडीदाराला न कळवता वैयक्तिक कर्ज घेतले आहे तर, पैशाच्या बाबतीत फक्त 30 % भारतीय त्यांच्या जोडीदारावर पूर्णपणे विश्वास ठेवत असल्याचे यात नमुद करण्यात आले असून, 68 % भारतीय महिला उच्च उत्पन्न असलेल्या जोडीदारापेक्षा आर्थिकदृष्ट्या स्थिर जोडीदार निवडण्यास प्राधान्य देत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. परंतु असे असूनही, भारतीय जोडपी आर्थिक बाबींवर खुलेपणाने चर्चा करणे टाळतात, ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र आहे.
कर्जातही महिलांचा टक्का वाढला, पुरुषांना टाकले मागे; वाचा, काय सांगतोय अहवाल ?
CIBIL स्कोअर म्हणजे काय?
सिबिल ही भारतातील सर्वात जुनी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे आणि ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या परवान्याखाली काम करते. ही एजन्सी व्यक्ती आणि व्यवसायांद्वारे कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या परतफेडीचा मागोवा घेते. बँका, क्रेडिट कार्ड कंपन्या आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) यांच्या डेटाच्या आधारे दर महिन्याला तुमची माहिती अपडेट केली जाते.
जेव्हा तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यासाठी जाता तेव्हा ते प्रथम तुमचा CIBIL स्कोअर तपासतात. CIBIL स्कोअर हा 300 ते 900 पर्यंतचा तीन अंकी क्रमांक असतो. यात 750 किंवा त्याहून अधिक सिबिल स्कोअर चांगला मानला जातो आणि त्यामुळे कर्ज मिळणे सोपे होते. परंतु, जर तुमचा CIBIL स्कोअर कमी असेल, तर बँका कर्ज देण्यास देण्यास कचरतात.
काय सांगता! क्रेडिट कार्डमुळेही होते पैशांची बचत; या टीप्स करतील मोठी मदत
कमी CIBIL स्कोअरची कारणे काय?
जर तुमचा CIBIL स्कोअर कमी असेल तर त्याचा तुमच्या आर्थिक निर्णयांवर परिणाम होऊ शकतो. चला तर मग सिबील स्कोअर कमी असण्याची मुख्य कारणे जाणून घेऊया.
कर्ज किंवा क्रेडिट कार्डची देणी वेळेवर न भरल्याने सिबील स्कोअर कमी होतो. शिवाय जर तुमचे कर्ज तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल, तर बँक तुम्हाला धोकादायक मानू शकते. तसेच जर तुम्ही दरमहा क्रेडिट कार्ड मर्यादेच्या जवळ खर्च करत असाल तर तुमच्या सिबील स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. वारंवार कर्जासाठी अर्ज करण्यानेही तुमचा स्कोअर घसरू शकतो.
कमी CIBIL स्कोअरमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात?
जर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर, तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. उदाहरणार्थ, कर्ज, क्रेडिट कार्ड मिळण्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या सर्वातून कर्ज मिळाले तरी त्यासाठी इतरांच्या तुलनेत तुम्हाला अधिकचे व्याजदर मोजावे लागू शकते.
क्रेडिट कार्ड युजर्सला SC चा मोठा झटका; उशीरा बिल भरणाऱ्यांना द्यावे लागणार 50 टक्के व्याज
CIBIL स्कोअर कसा सुधारायचा?
जर तुमचा CIBIL स्कोअर खराब असेल तर, घाबरून जाण्याची गरज नाही. ते सुधारण्याचे काही स्मार्ट मार्ग आहेत. जसे की,
1. सर्व कर्जे आणि बिले वेळेवर भरा.
– ईएमआय आणि क्रेडिट कार्ड बिलांमध्ये कधीही डिफॉल्ट करू नका.
– दरमहा संपूर्ण क्रेडिट कार्ड बिल भरण्याचा प्रयत्न करा.
2. जास्त कर्ज घेणे टाळा
– जर तुमच्याकडे आधीच अनेक कर्जे चालू असतील तर नवीन कर्ज घेणे टाळा.
– तुमच्या क्रेडिट मर्यादेच्या 30% पेक्षा जास्त वापरू नका.
3. जुने क्रेडिट कार्ड बंद करू नका
– जुने क्रेडिट कार्ड कोणत्याही कारणाशिवाय बंद केल्याने तुमच्या क्रेडिट इतिहासावर परिणाम होऊ शकतो.
4. नवीन कर्ज सुज्ञपणे घ्या
– कर्जासाठी वारंवार अर्ज करणे टाळा कारण तुमचा CIBIL स्कोअर प्रत्येक वेळी तपासला जातो, ज्यामुळे तुमचा स्कोअर कमी होऊ शकतो.
5. तुमचा CIBIL अहवाल नियमितपणे तपासा.
– तुमच्या अहवालात काही चुकीच्या नोंदी आहेत का ते तपासण्यासाठी. जर तुम्हाला काही चूक आढळली तर ती त्वरित दुरुस्त करा.