मेहुणा अन् पुतण्याने केला काँग्रेसचा ‘घात’ : निकालापूर्वीच भाजपच्या पहिल्या विजयाची Inside Story

मेहुणा अन् पुतण्याने केला काँग्रेसचा ‘घात’ : निकालापूर्वीच भाजपच्या पहिल्या विजयाची Inside Story

सुरत : लोकसभा निवडणुकीसाठी नुकतचं पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. तर 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर सात मे रोजी तिसरा, 13 मे रोजी चौथा, 20 मे रोजी पाचवा, 25 मे रोजी सहावा आणि एक जूनला शेवटचा म्हणजेच सातवा टप्पा पार पडणार आहे. चार जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच भाजपने (BJP) आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. ‘अबकी बार 400 पार’ नारा देणाऱ्या भाजपला गुजरातच्या सुरतमधून पहिला खासदार मिळाला आहे. भाजपच्या मुकेश दलाल (Mukesh Dalal) यांची बिनविरोध निवड झाली असून आयोगाने त्यांना विजयाचे प्रमाणपत्रही दिले आहे. (BJP’s Mukesh Dalal was elected unopposed from Surat Lok Sabha constituency)

सुरत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तब्बल दोन दिवस चाललेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारधी यांनी काँग्रेसच्या मुख्य आणि डमी अशा दोन्ही उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले. त्यानंतर उर्वरित आठ उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपच्या मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार बिनविरोध निवडून येण्याची भाजपसाठी ही पहिलीच वेळ आहे. मात्र त्याचवेळी काँग्रेसने भाजपवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले आहेत. शिवाय उच्च न्यायालयातही जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे निवडणूक वादात सापडली आहे.

नेमके काय झाले सुरतमध्ये?

गुजरातमधील सर्व 26 जागांवर तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच सात मे रोजी मतदान होणार आहे,  त्यासाठी 19 एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. तर 22 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची तारीख होती. यात सुरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि भाजपसह एकूण 11 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भाजपकडून मुकेश दलाल, काँग्रेसकडून नीलेश कुंभानी, बसपकडून प्यारेलाल भारती, सरदार वल्लभभाई पटेल पक्षाकडून अब्दुल हमीद खान, ग्लोबल रिपब्लिकन पक्षाकडून जयेश मेवाडा, लॉग पार्टीकडून सोहेल खान यांनी अर्ज दाखल केले होते. याशिवाय अजितसिंग उमत, किशोर दयानी, बरैया रमेशभाई आणि भरत प्रजापती हे अपक्ष निवडणूक रिंगणात होते. याशिवाय काँग्रेसने सुरेश पडसाळ यांनाही डमी उमेदवारी दिली होती.

सुरुवात उदयनराजेंपासून… पवारांनी पाच वर्षात मान्य केल्या ‘पाच चुका’

छाननी दरम्यान भाजपने कुंभानींच्या अर्जावर आक्षेप घेतला. त्यांच्या अर्जावर प्रस्तावकांच्या नकली सह्या असल्याचा दावा भाजपने केला. पण आपल्या अर्जावर प्रस्तावक म्हणून मेहुणा, पुतण्या आणि पार्टनरच्या सह्या असल्याचा दावा कुंभानी यांनी केला होता. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारधी यांनी तिन्ही प्रस्तावकांना सह्या त्यांच्याच आहेत का? याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. तिन्ही प्रस्तावकांनी रविवारी प्रतिज्ञापत्र दाखल करून निलेश कुंभानी यांच्या फॉर्मवर आपली सही नसल्याचे सांगितले, त्यानंतर तिघेही उमेदवार प्रस्तावक गायब झाले. त्यामुळे कुंभानी यांचा अर्जच रद्द करण्यात आला.

आयोगाने सुरतमधील काँग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाळ यांचाही अर्ज याच कारणामुळे रद्द केला. निवडणूक अधिकारी सौरभ पारधी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, कुंभणी आणि पडसाळा यांनी सादर केलेल्या नामनिर्देशनपत्रांवर तीन प्रस्तावकांच्या सह्या योग्यरित्या आढळल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यावर काँग्रेस पक्षाचे वकील बाबू मांगुकिया म्हणाले, “निलेश कुंभानी आणि सुरेश पडसाळ यांचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले आहेत. चार प्रस्तावकांनी फॉर्मवरील स्वाक्षऱ्या त्यांच्या नाहीत, असे सांगितल्याने आयोगाने ही कारवाई केली.”

सोलापुरमध्ये वंचितचा यू-टर्न! लोकसभेच्या रणसंग्रामातून घेतली माघार, काय आहे कारण?

काँग्रेसने पर्यायी उमेदवार का दिला?

निवडणूक अधिकाऱ्यांच्या छाननीमध्ये मुख्य उमेदवाराचा उमेदवारी अर्ज नाकारला गेला किंवा उमेदवाराचा मृत्यू झाला, तर पर्यायी उमेदवार हा पक्षाचा मुख्य उमेदवार बनतो. बहुतांश प्रमुख राजकीय पक्ष बॅकअप म्हणून पर्यायी किंवा कव्हरिंग उमेदवार उभे करतात. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतच या उमेदवाराचा अर्ज वैध राहील. मुख्य उमेदवाराचे नामनिर्देशन निवडणूक कार्यालयाने मंजूर केल्यावर पर्यायी उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र अवैध ठरवले जाते. ज्या मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत आहे, तेथे काही पक्ष अपक्ष म्हणून उमेदवार उभे करतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube