महायुतीचा फुगा फुटला ! मविआला सर्वाधिक जागा, गेल्या वेळी एक जागा जिंकणारा काँग्रेस ‘बिग बॉस’
Lok Sabha Maharashtra Result-देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला बहुमत मिळाले पण महाराष्ट्रात मात्र महायुतीचा 45 प्लॅस जागा जिंकण्याचा नारा सपशेल फोल ठरलाय. 48 जागांपैकी महाविकास आघाडीने सर्वाधिक 30 जागा जिंकल्या आहेत. तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. तर महायुतीने 17 जागा जिंकल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा विचार करता गेल्या वेळेस केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेस/strong>ने (Congress) यंदा सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस हा राज्यात ‘बिग बॉस’ ठरलाय.
Loksabha Election Result : भाजप न हारले न जिंकले; 400 पारची गणितं कुठे आणि कशी चुकली?
महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक तेरा जागा मिळाल्या आहेत. तर शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्या आहेत. 21 जागा लढविणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नऊ खासदार विजयी झाले आहेत. तर सांगलीतून विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. ते काँग्रेसचेच आहेत. तर महायुतीने 17 जागा जिंकल्या आहेत. त्यात भाजपने सर्वाधिक नऊ, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागा जिंकली आहे.
चंद्राबाबूंसह ज्यांना भाजपने छळले ते इंडिया आघाडीत येणार…; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
पवारांनी अटीतटीच्या पाच जागा खेचून आणल्या !
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दहा जागा लढविल्या होत्या. त्यातील आठ जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. वर्ध्यातून अमर काळे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे, माढ्यातून धैर्यशील मोहिते, भिवंडीतून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, बीडमधून बजरंग सोनवणे, नगरमधून निलेश लंके हे विजयी झाले आहेत. तर दिंडोरीत भास्कर भगरे यांनी बाजी मारली आहे. माढा, अहमदनगर, भिवंडी, बीड, दिंडोरी या पाच जागा राष्ट्रवादीने खेचून आणल्या आहेत. भिवंडीत भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला आहे. तर नगरमध्ये लंकेंनी विखेंना धूळ चारली आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांबरोबर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे व साताऱ्याचे श्रीनिवास पाटील खासदार हे खासदार होते. त्यातील साताऱ्याची जागा शरद पवारांना गमवावी लागली आहे. येथून उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केलाय. तर रावेरमध्ये श्रीराम पाटील यांना काही करिश्मा दाखविता आला नाही.
नऊ खासदार आले पण कोकणात शिवसेनाला मोठा झटका बसलाय
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक 21 जागा लढविल्या होत्या. त्यातील नऊ जागा जिंकल्या आहेत. त्या मुंबईतून अरविंद सावंत, संजय दिना पाटील, अनिल देसाई असे तीन खासदार निवडून आले आहेत. अमोल कीर्तीकर आणि एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात टफ फाइट झाली. त्यात वायकर विजयी झाले. मराठवाड्यात धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर मोठ्या मताने विजयी झाले आहेत. परभणीमध्ये संजय जाधवांनी पुन्हा बाजी मारली आहे. तर शिर्डीमधील भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी झाले आहेत. यवतमाळमधून ठाकरे सेनेचे संजय देशमुख हे जिंकून आले आहेत. तर नाशिकमधून राजाभाऊ वाझे यांनी बाजी मारली आहे. तर हिंगोलीत नागेश आष्टीकर हे विजयी झाले आहेत. सिंधुदुर्ग-रत्नागिरीत खासदार विनायक राऊत पराभूत झालेत. ठाण्यात खासदार राजन विचारे यांचा पराभव झाला आहे.
काँग्रेसने कुठे बाजी मारली ?
17 जागा लढणाऱ्या काँग्रेसने तेरा जागा जिंकल्या आहेत. सोलापूर प्रणिती शिंदे, कोल्हापूर छत्रपती श्रीमंत शाहू महाराज, मुंबईतून वर्षा गायकवाड, जालन्यातून कल्याण काळे, लातूरमधून शिवाजी काळगे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, चंद्रपूर प्रतिभा धानोरकर, अमरावतीत बळवंत वानखडे, रामटेक श्यामकुमार बर्वे, गडचिरोलीत नामदेव किरसान, भंडारा-गोंदियातून प्रशांत पडोळे, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, धुळ्यातून शोभा बच्छाव अशा तेरा जागा जिंकल्या आहेत.
तर महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक 28 जागा लढत्या होत्या. परंतु नऊच जागा जिंकल्या आहेत. मुंबईतून मंत्री पियूष गोयल, नागपूरमधून नितीन गडकरी, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, रावेरमधून रक्षा खडसे, जळगावमधून स्मिता वाघ, सिंधुदुर्गातून नारायण राणे, अकोल्यातून अनुप धोत्रे, पालघरमधून हेमंत सावरा विजयी झाले आहेत. अजित पवार गटाचे रायगडमधून सुनील तटकरे विजयी झाले आहेत.
शिंदे गटाने संभाजीनगर जिंकले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सात जागा जिंकल्या आहेत. मावळमधून श्रीरंग बारणे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, ठाण्यातून नरेश म्हस्के, बुलढाण्यात प्रतापराव जाधव, संभाजीनगरमधून संदीपान भुमरे, हातकणंगलेतून धैर्यशील माने, मुंबईतून रवींद्र वायकर असे सात खासदार जिंकून आले आहेत.