Ground Report : जानकर की बंडू जाधव, परभणीचा ‘बॉस’ कोण? जातीच्या मुद्द्यावर फिरली होती निवडणूक…
रासपच्या महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी दीड महिन्याभरापूर्वी परभणी लोकसभा मतदारसंघातून (Parbhani Lok Sabha Constituency) महायुतीकडून अर्ज भरला, तेव्हा त्यांनी रिस्क घेतल्याचं बोलले गेले. माढ्यासारखा सेफ मतदारसंघ सोडून त्यांनी तिकडून उमेदवारी का घेतली? असा प्रश्न अनेकांनी विचारला. यावर जानकर यांनी “कुठूनही उभे राहण्याचा अधिकार आणि मतदारसंघाचा विकास ही कारणे सांगितली. पण तरी यामागे सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो जातीचा. हाच जातीचा फॅक्टर परभणी मतदारसंघात तुफान चालला. महाराष्ट्रात सुरु असलेला ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद परभणीकरांनी याची देही याची डोळा अनुभवा… त्यामुळेच परभणीचा बॉस यंदा कोण? हा सर्वात महत्वाचा प्रश्न विचारला जातोय…. पाहुया नेमके परभणीमध्ये काय चर्चा सुरु आहेत. (Mahadev Jankar or Sanjay Jadhav, who is Parbhani’s boss)
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची आणि मराठा विरुद्ध ओबीसी वादाची झळ सर्वात जास्त कुठे जाणवली असेल तर ती मराठवाड्यामध्ये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठवाड्यात जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याचे मान्य केले. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण या प्रश्नाची दाहकता जास्त होती. यातही महायुतीकडून बीडमध्ये वंजारी आणि परभणीमध्ये धनगर तर महाविकास आघाडीकडून मराठा उमेदवार मैदानात होते. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद चांगलाच पेटलेला पाहायला मिळाला. या दोन्ही जिल्ह्यांमधील निवडणूकही याच मुद्द्यांवर फिरताना दिसली.
तुर्तास आपण परभणीची चर्चा करु.
परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण 21 लाख मतदान आहे. यात हटकर, धनगर, माळी, वंजारी आणि मायक्रो ओबीसींचे मिळून जवळपास 10 लाख मतदान आहे. तर मराठा, मुस्लीम आणि त्याखालोखाल दलित समाजाचे मतदान आहे. अशा या ओबीसीबहुल मतदारसंघातून आतापर्यंत संजय जाधव हे मराठा समाजातील खासदार दोनवेळा निवडून आले आहेत. यावेळी जाधव यांच्यासमोर जानकर यांच्यासारखा धनगर समासाचा नेता मैदानात होता. त्यामुळे राज्यात धुमसणाऱ्या मराठा विरुद्ध ओबीसी वादात ही निवडणूक जातीवर शिफ्ट होणार हे पहिल्याच दिवशी फिक्स झाले होते. सुरुवातीच्या टप्प्यात ‘स्थानिक’ विरुद्ध ‘बाहेरचा’ असा प्रचाराचा सूर होता. नंतरच्या टप्प्यात मात्र ओबीसी विरुद्ध मराठा असा प्रचाराचा सूर झालाच.
आता काय आहेत चर्चा?
परभणी लोकसभा मतदारसंघ हा परभणी आणि जालना या दोन जिल्ह्यात पसरला आहे. परभणीतील जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी हे चार विधानसभा मतदारसंघ येतात. तर जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी यांचा समावेश होतो. यात जिंतूरमध्ये भाजपाच्या मेघना बोर्डीकर आमदार आहेत. परभणीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे राहुल पाटील, गंगाखेडमधून रासपचे रत्नाकर गुट्टे, पाथरीमधून सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे आमदार आहेत. जालना जिह्यातील परतूरमध्ये भाजपचे बबनराव लोणीकर आणि घनसावंगी येथून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश टोपे हे आमदार आहेत.
दोन्ही बाजूंचे पक्षीय बलाबल हे समसमान असले तरी मतदारसंघ ओबीसी बहुल असल्याने महादेव जानकर यांना फायदा होईल असे बोलले जाते. त्याचवेळी मराठा समाजाने संजय जाधव यांना साथ दिल्याचे दिसून आले.
विधानसभानिहाय चित्र बघायचे झाले तर जिंतूर आणि गंगाखेड हे दोन विधानसभा मतदारसंघ ओबीसी बहुल असल्याने सामना चांगला झाल्याचे चित्र आहे. यासोबत गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे हे रासपचेच आमदार असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका इथे राष्ट्रीय समाज पक्षाची चांगली ताकद आहे. पण गंगाखेडला जोडून पूर्णा तालुका आहे. ते संजय जाधव यांचे होमपीच आहे. ते आमदार असताना त्यांचा या तालुक्याशी संबंध होता. त्यामुळे पूर्णा तालुक्यातून ते ही कसर भरुन काढतील असे बोलले जाते.
भुजबळ अजिबात नाराज नाही; आशीर्वाद घेत भाजपच्या ‘संकटमोचक’ महाजनांची स्पष्टोक्ती
जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर यांनी जानकरांचे चांगले काम केलेआहे. त्यामुळे जिंतूर तालुक्यातूनही जरी त्यांना मायनसमध्ये मतदान झाले तरी सेलूमधून त्यांना चांगले मताधिक्य मिळू शकते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून महादेव जानकरांपेक्षा एक तरी मत जास्त घेऊ आणि किमान एक लाखांच्या लीडने निवडून येऊ असा दावा संजय जाघव यांनी नुकताच लेट्सअप मराठीसोबत बोलताना केला आहे. परभणीत मुस्लिम समाजाचे वर्चस्व आहे. विजयासाठी या मतांचे एकत्रीकरण वा धुव्रीकरण या दोन्ही बाबी स्पर्धेतील प्रमुख उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. यंदा मराठा विरुद्ध ओबीसी वादात मुस्लिम समाजाने जाधव यांना साथ दिल्याचे बोलले जाते. त्याखालोखाल मराठा, ब्राह्मण, ओबीसी आणि संख्येने कमी असलेल्या छोट्या जातींनी जाधव यांना मतदान केलेले असू शकते.
Ground Report : नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचं वजन वाढलं… त्यांची मतेच ठरवणार ‘नाशिकचा’ खासदार!
महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मतदारांचा दुसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथरी मतदारसंघातही जाधव आघाडीवर राहतील असे चित्र आहे. जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी या मतदारसंघातूनही मराठा समाजाची जाधव यांना साथ मिळाल्याचे बोलले जाते. याच घनसावंगी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी हे गाव आणि अंबड तालुका येतो. थोडक्यात मराठा समाजाने एकगठ्ठा पद्धतीने, मुस्लीम आणि दलित समाजाने बहुतांशपणे जाधव यांना साथ दिली आहे. तर ओबीसी समाजाने जानकरांना साथ दिली आहे. त्यामुळे यात नेमके कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.