आमदारांची वाढणार धाकधुक, मनोज जरांगे यांची मोठी घोषणा, सर्व 288 जागांवर उमेदवार देणार
Manoj Jarange On Lok Sabh Election : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabh Election) रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील 8 लोकसभा मतदारसंघासह देशातील 88 लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. राज्यातील वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघात मतदान होत आहे.
मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी देखील आज परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागडच्या गोरी गांधारी येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा करत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभेला सर्वच्या सर्व 288 जागांवर उमेदवार देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील सर्व आमदारांची धाकधुक वाढली आहे.
मनोज जरांगे म्हणाले, आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार दिले नसले तरी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व 288 जागांवर उमेदवार देणार आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाला पाडा हे सांगितलेले नाही, पण कोणी गैर अर्थ काढू नये. या निवडणुकीत मी किंवा मराठा समाजाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही किंवा एकही अपक्ष उमेदवार उभा केलेला नाही असं मतदानानंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले. आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे मनोज जरांगे म्हणाले, मी मराठा समाजाला आवाहन करतो, त्यांनी मराठा आणि कुणबी यांच्या बाजूने असणाऱ्या उमेदवाराला सहकार्य करावे. एखाद्याला पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय आहे, यावेळेस पाडणारे बना. जो उमेदवार सगे सोयऱ्यांच्या बाजुचा आहे त्याला मतदान करावे, असं देखील जरांगे म्हणाले.
धक्कादायक! 70 टक्क्यांपेक्षा जास्त भारतीय ‘डीपफेक’च्या जाळ्यात; मतदारही गोंधळात
दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या गाठीभेटी करताना अचानक प्रकृती खालावल्याने मनोज जरांगे यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर मधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यामुळे ते आज अॅम्बुलन्समधून मतदानासाठी आले होते.